दिनांक २० ऑगस्ट रोजी माझे आजोबा तुकाराम गरड उर्फ बापू यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. बापूचे असे आमच्यातून निघून जाणे प्रचंड वेदनादायी होते. नातवाचा पहिला दोस्त आजोबा असतो. लहानपणी आमच्या लाडशेतातून घरी येताना बापू मला खांद्यावर बसवायचे. मी त्यांच्या डोक्याला घट्ट पकडून खांद्यावर दोन्ही पाय सोडून ऐटीत बसायचो. माझे ओझे खांद्यावर घेतलेल्या बापूंच्या पार्थिवास खांदा देताना त्या ओझ्याची आठवण झाली. बापूसोबतच्या माझ्या गेल्या ३२ वर्षाच्या आठवणी काही शब्दात व्यक्त करणे कठीणच. बाहेरून कुठूनही आलो की ढळजेत बसलेले बापू लगेच विचारपूस करायचे पण आता घराच्या उंबऱ्यात पाऊल टाकताच समोर दिसणारी बापुची रिकामी जागा सदैव त्यांची आठवण करून देत राहील.

आमच्या वाड्यातिल ढाळजेत तक्क्याला रेलून बसून खलबत्त्यात पान कुटतानाचे बापू आता पुन्हा दिसणार नाहीत, मी दूर व्याख्यानास गेलो की “अरे बघ की फोन लावून कुठवर आलाय” असे आमच्या दादांना म्हणणारे बापू पुन्हा दिसणार नाहीत, सकाळी लवकर उठून अंघोळ अष्टमी आटोपून पाणी पिऊन ढाळजेकडे जाताना दमदार आवाज टाकून “ए चहा आण रे” असे म्हणणारा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही, गावातील कोणत्याही लग्नातली त्यांच्या वरच्या पट्टीतली मंगलअष्टका पुन्हा कानावर पडणार नाही, श्रीराम नवमीच्या सप्ताहचे नियोजन करताना, भजन म्हणताना बापू दिसणार नाहीत. बहिणीच्या लेकरांसोबत लहानात लहान होऊन खेळणारे बापू पुन्हा दिसणार नाहीत आणि आम्हा कुटुंबियांची प्रचंड काळजी करणारे बापू आमच्यात इथून पुढे असणार नाहीत   हा विचार डोळ्यातील पाणी बाहेर पडायला प्रवृत्त करतोय.

आमच्या खांदानात सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी हातात माईक पकडला असेल तर तो बापूंनी. हजारो लग्नात मंगलाष्टके गायले त्यांनी. भजनात  किर्तनात त्यांचा आवाज वरच्या पट्टीत लागायचा. मला पकवाज शिकवला बापूंनी. बापू म्हणजे जुन्या नातेवाईकांची एक डिक्शनरी होते. खूप खूप जुन्या आठवणी, गावाबद्दलच्या त्यांच्या काळातीळ राजकीय आणि सामाजिक ठळक गोष्टी, संत तुकारामांची गाथा, भारताच्या १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्याची सकाळ, फाळणीचा काळ हे सगळं मला बापूंच्या तोंडून अनुभवायला मिळाले. बापू अतिशय समृद्ध आयुष्य जगले. पोराची राजकीय कारकिर्द आणि नातवाची प्रबोधनाची कारकीर्द ते पाहू शकले. माझ्या पोरीचे तोंड पाहून तिच्या चेहऱ्यावरून फिरवलेला त्यांचा मायेचा हात सदैव स्मरणात राहील.

माणूस जन्म घेतो तेव्हाच त्याचा मृत्यू लिहिलेला असतो फक्त तो केव्हा असतो हे माहीत नसते म्हणूनच आपण आनंदात जगत असतो. माणूस किती वर्षे जगला यापेक्षा मृत्यूपासून तो किती वर्षे वाचला हेच खरे वास्तव असते. म्हातारपणाच्या कसल्याही वेदना बापूंना झाल्या नाहीत, अखेरच्या दिवसापर्यंत त्यांना हाताला धरून न्यावे लागले नाही, काठी असायची हातात पण ती सुद्धा जमिनीवर न टेकवता रुबाबात हातात धरून चालायचे आमचे बापू. त्यांच्या आवाजातला करारीपणा, चालण्यातला ताठपणा नाहीच कधी विसरणार. “बापू, तुमचा पान कुटायचा खलबत्ता, गळ्यातली तुळशीमाळ, हातातली अंगठी, पेपर वाचायचा चष्मा, तुमचं छाटन आणि सदरा हे सगळं साहित्य तुमच्या स्मृती म्हणून जपलं जाईल जेव्हा कधी तुमची आठवण येईल तेव्हा या वस्तूत तुम्ही दिसाल. बापू, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम केलं त्याही पेक्षा जास्त प्रेम तुम्ही आम्हाला दिलंय. तुम्ही सदैव आमच्या हृदयात जिवंत राहाल जब तक है जान”.

बापूंचा नातू : विशाल गरड
दिनांक : २० ऑगस्ट २०२०