आज मी माझा वाढदिवस अनाथ मुलींसोबत साजरा केला. लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस असल्याने तो विरासाठी सुद्धा स्पेशल होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील आळणी पाटीवरच्या माळरानावर वसलेल्या स्वआधार अनाथ मुलींच्या निवासी प्रकल्पात वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथल्या लहान बहिणींना खाऊ म्हणुन फळे घेऊन गेलो होतो. तिथल्या प्रशासनाने माझ्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली होती. आजवर बहुतांशी वाढदिवस ईथेच साजरे झालेत. या संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक असुन ईथल्या अनाथ मुलींचा खुप चांगला सांभाळ केला जातो. आपल्याला असंख्य नातीगोती असतात, मित्र आप्तेष्ट असतात परंतु देवाने दिव्यांग बहाल केलेल्या या अनाथ, निरागस मुलींनाही आपल्या प्रेमाचा जिव्हाळा मिळायला हवा. मायेचे पांघरून मिळायला हवे. मदतीचा हात मिळायला हवा याच एका पवित्र उद्देशाने मी या संस्थेशी जोडला गेलोय.

यावर्षीचा वाढदिवस अनेक गोष्टींनी स्पेशल ठरला आहे परंतु त्यापैकी एक गोष्ट म्हणजे माझ्या बायकोचे पहिले भाषण. आज तिने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा माईक हातात धरला. तिचे अठ्ठेचाळीस संकंदाचे पहिले भाषण खुप सुखावणारे होते. वक्तृत्व ही शिकण्याची कला आहे. प्रयत्नाने ती प्रत्येकजन शिकू शकतो. विराच्या शब्द पेरणीला आज वाढदिवसाच्या औचित्याने प्रारंभ झाल्याने सुखावलो. माझ्यासारख्या गावरान वक्त्याच्या कानात विराचे शुद्ध आणि स्वच्छ शब्द अमृत बनून उतरले. बायकोचे भाषण ऐकण्याचा सुखद क्षण अनुभवता आल्याने भारी वाटलं.

आजवर माझ्या दहा घासातला एक घास मदत म्हणुन अशा संस्थांना देत आलोय. माझ्या मेंदुने जरी विचारांच्या श्रीमंतीचा आलेख ओलांडला असला तरी खिसा मात्र सर्वसामान्यांएवढाच आहे, यातुनही हा विचार सर्वत्र रुजावा म्हणून अट्टाहास असतो. छोट्या छोट्या असंख्य मदतीतूनच एक मोठी मदत तयार होत असते त्यातुनच मग अशा अनाथांची भूक भागते. भरलेल्या ताटातला एक घास भुकेल्यासाठी बाजूला काढूण ठेवण्याची परंपरा आमच्या राणीसाहेबांनी देखिल, येथील शिक्षिकांजवळ फुल न फुलाच्या पाकळीएवढी आर्थिक मदत देऊन कायम ठेवल्याने अभिमान वाटला.

यावेळी मी बोलताना तिथल्या मुलींचा सांभाळ करणाऱ्या शिक्षक, शिक्षिका, प्रकल्प संचालक आणि संस्थाध्यक्ष शहाजीराव चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक केले. चार भिंतींच्या आतमधले त्यांचे समाजकार्य चार भिंतींबाहेरील कार्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण अजुनही गरिबी श्रीमंतीच्या विळख्यात अडकून पडलो आहोत पण या पोरी मात्र या दोन्ही शब्दांपासुन अनभिज्ञ आहेत. आपण आपली श्रीमंती संपत्तीत मोजतो; ईथे मात्र ती नात्यात मोजली जाते. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ जन्मापासुन आपली आई कोण ? हे ही माहित नसलेल्या, समाजाने जगणं नाकारलेल्या या पोरी आनंदाने या वसतीगृहात वाढत आहेत. त्यांच्याकडं आज सगळं आहे बस्स तुमच्या मायेची ऊब हवी आहे. यावेळी युवा दिग्दर्शक अमोल लोहार, हनुमंत हिप्परकर आणि सई सातपुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर स्वआधारचे थोडसरे सर व त्यांच्या संपुर्ण टिमने दिलेली वागणूक ह्रदयात कोरली गेलीय. आपल्या वाढदिवसाच्या पारंपारिक सादरीकरनाला थोडासा फाटा देऊन कधीतरी अशा अनाथांसोबत वाढदिवस साजरा करून पहा दिल को सुकुन मिलेगा.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ मे २०१९ (वाढदिवस विशेष)