प्रिय विठ्ठल,
अभिनयाशी संघर्ष करत स्वतःमधल्या अभिनेत्याला योग्य जागी नेण्यासाठीची तुझ्या धडपडीचा साक्षिदार असल्याचाच अभिमान वाटतोय यार. ‘तुकाराम’ हा मराठी चित्रपट आपल्या बार्शीच्या आशा टाॅकीजमध्ये आई वडीलांसह प्रेक्षकात बसुन पाहणारा तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटलास तेव्हाच वाटलेलं एक दिवस फक्त तुझाच येईल. त्या गर्दीला माहितही नव्हते कि या चित्रपटात काम केलेला एक हिरो आपल्यातच बसलाय म्हणुन. तेव्हा मी तुझ्या आई वडीलांना सांगितलेलं की एक दिवस एवढी गर्दी फक्त विठ्ठलावर टाळ्या शिट्ट्यांचा अभिषेक करायला येईल. काबाड कष्ट करून खोबनीत गेलेले त्यांचे डोळे तुला मोठ्ठ्या पडद्यावर पाहून नक्कीच सुखावले असतील. एका क्लासमध्ये तुझी मी घेतलेली पहिली छोटेखानी मुलाखत अजुनही आठवतेय, पानगावात शिवकालीन अष्टकोनी तलावाजवळच्या रोडवर झालेली भेट अजुनही आठवतेय तसेच पुण्यातल्या तुझ्या १०×१० रूम मधली भेटही ठळकपणे आठवतेय. जेव्हा जेव्हा भेटलास तेव्हा अभिनयाचा मुखवटा खुंटीवर अडकवून मित्र म्हणुन आपुलकीने भेटलास. स्वतःच्या साधेपणाची जाणिव करून दिलीस.

आज लोकांनी एखाद्या पिक्चरमध्ये साईड रोल केला तरी लगेच अभिनेते म्हणून मिरवायला लागतात परंतु तू मला नेहमी म्हणायचास ‘विशाल’ यार असं काहीतरी काम करायचंय की लोकं स्वतःहून मला अभिनेता म्हणतील. आजवर डझनभर मराठी चित्रपटासह हिंदी व इंग्रजी चित्रपटात काम केलंस पण प्रसिद्धीपासुन दुर राहिलास. स्टारडमचा कधीच डंका नाही वाजवला पण खरं सांगू तू आज ती उंची गाठली आहे. तुझा ‘राक्षस’ चित्रपट प्रिमिअर दिवशीही मी एक पोस्ट लिहिली होती त्यात लिहिलेलं की “राक्षस मार्फत तुला अभिनयाचं देवपण मिळो” आता तुझ्या आगामी ‘कागर’ या बहुचर्चित चित्रपटातून प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात देवाचं देऊळ तयार होईल यात शंका नाही. नुकताच कागरचा ट्रेलर पाहिला आणि त्यात तुला पाहूण माझ्या शब्दांच्या बँकेतला तुझ्या कौतुकाचा चेक वटला म्हणुनच हा शब्दप्रपंच मांडू शकलो. ये तो शुरूवात है मेरे दोस्त और तो हमे रेड कार्पेट पे चलना है.

(टिप : मकरंद माने दिग्दर्शित ‘कागर’ या चित्रपटात विठ्ठल काळे हा माझा दोस्त; संतोष उर्फ ‘भाऊड्या’ नावाचे कॅरॅक्टर प्ले करतोय. मुख्य अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेते शशांक शेंडे व शभंकर तावडे यांसोबत आपल्या भावड्याचा दर्जा अभिनय पहायला थेटरात नक्की जावा.)

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक :१६ एप्रिल २०१९