यवतमाळ जिल्हयातील पांढरकवढा येथे अवनी या वाघिनीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. हैद्राबादचा नेमबाज नवाब शफात अली खान यांचा मुलगा असगरने वाघिणीला गोळी घातली. वाघिणीला फक्त बेशुद्ध करून कैद करा असा हाय कोर्टाचा स्पष्ट निर्देश असतानाही वनखात्याकडूनच या नियमाचे उल्लंघन करण्यात आले. वाघ हा अन्नसाखळीतला सर्वात महत्वाचा घटक आहे. त्याचे अस्तित्व निसर्गाचा समतोल साधतो हे माहित असतानाही एक वाघिण आणि तिच्यावर अवलंबून असलेले दोन बछडे यांचा संहार केला गेलाय. ईकडे आमच्याकडे रानडुकरे आणि हरणं शेतकऱ्याच्या पिकांची प्रचंड नासाडी करत आहेत. तोंडचा घास कित्येकदा या वन्यजिवांच्या नासधूशीमुळं निघून गेलाय. त्यांचा बंदोबस्त करायचा सोडून वाघिणीला जिवे मारण्यासाठी चार हत्ती, तीन मोठे पिंजरे, पाच शार्पशुटर, आणि दोनशे वन कर्मचाऱ्यांना तैनात करून यांना कोणती मर्दुमकी गाजवायची होती कुणास ठाऊक.

खरं म्हणजे बलात्कार करणाऱ्या नराधमांना तिच्या जंगलात सोडायला हवं होतं. कोपर्डीच्या आरोपींसारखी माणसं द्यायची की तीला खायला. बलात्कार करणाऱ्या आरोपींना गुन्हा सिद्ध झाल्यास अवनी या वाघिणीला खायला दिलं जाईल असं फर्मान काढायला हवं होतं. तीच्या नरभक्षी स्वभावाचा फायदा असा करून घेता आला असता. मान्य आहे मानवाधिकार अशा अमानुष गोष्टींना परवानगी नाही देऊ शकत परंतु सध्या माणसावर कायद्याचा वचक राहीला नाही तेव्हा गुन्हेगाराला वाघाच्या पिंजऱ्यात टाकायची जुनी पद्धत पुन्हा सुरू करायला हवी. शिवरायांच्या काळात लोखंडी पोशाख घालून आणि हातात मशाल घेऊन एक माणूस वाघाला जेरबंद करायचा परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शेकडो माणसांचा लवाजमा घेऊन एक वाघिण जेरबंद करता न येणे हि दुर्दैवी गोष्ट आहे.

दिडशे लोकं मारून कसाब कितीतरी दिवस जगला, कोपर्डीतले आरोपी अजुनही जिवंत आहेत. या वाघिनीवर मात्र दोन वर्षात १३ लोकांना खाल्ल्याचा आरोप लावून तीला ठार करण्यात आलं. तीची बाजू ऐकून घेतली असती तर तिने कदाचित तिचाही खटला लढवला असता. माणसाचे जंगलावर होणारे अतिक्रमण आणि तस्करीसाठी वाघांची होणारी हत्या या गोष्टीं जर तीच्याही बाबतीत घडल्या असतील तर ? माणसं खायला अवनी माणसाच्या घरात गेलती की माणूस तीच्या जंगलात गेलता हे सुद्धा पडताळायला हवे. त्या मेलेल्या १३ माणसांच्या शवविच्छेदनानुसार फक्त एका माणसाचा मृत्यू वाघिणीने केल्याचे निष्पन्न झाले आहे तरी तीला १३ लोकांच्या मृत्यूस जबाबदार धरून ठार करण्यात आलंय. वनविभागाएवढी तत्परता जर आपल्या गृह खात्याने दाखवली असती तर गुंड लोकं औषधालाही राहीली नसती.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०४ नोव्हेंबर २०१८