आमच्या घराच्या अंगणात एक लाकडी टेबल आहे. गेली आठवडाभर तो पावसात भिजतोय. कशाचातरी बी त्यावर पडला असावा. आज सकाळी आंघोळ करून येताना त्या टेबलाकडे सहज लक्ष गेले तर ईतरत्र पडलेल्या साहित्यात दोन हिरवी पानं दिमाखात लहरताना दिसली. थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर फक्त मुळांच्या आधारावर त्या टेबलाला भेदून हे इवलंस रोपटं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करताना दिसलं.

जिथं माणसं क्षुल्लक कारणावरूण जीव देतात आणि संकटांशी संघर्ष करायचा सोडून जगणं नाकारतात तिथं हे इवलंस रोपटं माती नसतानाही सामर्थ्याने उभे राहते. कारण त्याला मातीपेक्षा स्वतःच्या मुळांवर जास्त विश्वास आहे. माणसानेही परिस्थितीपेक्षा स्वतःच्या मनगटावर आणि कष्ट करण्याच्या प्रवृत्तीवर विश्वास ठेवला की प्रतिकुल परिस्थितीतही या रोपट्यासारखं उभं राहता येतं.

या रोपट्याला माहित आहे की या टेबलावरच राहून आपलं झाडात रुपांतर होऊ शकणार नाही, हा टेबल वापरताना तो पुसताना आपण सहज उखडून फेकलो जाणार, नकळत एखादीजरी वस्तू कुणी त्या टेबलावर ठेवली तरी त्याखाली आपण चिरडलो जाणार. हे सगळं ज्ञात असतानाही निसर्गाने दिलेला जगण्याचा आजचा क्षण मला दिमाखात जगला पाहिजे बस्स एवढंच त्याच्या ध्यानी असावं. अरे माणसा जरा शिक या रोपट्याकडून.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक :१७ सप्टेंबर २०१९