जिथे एका विधानसभेसाठी वीस तीस कोट पुरत नाहीत तिथं देवेंद्र भुयार सारखी माणसं लोकवर्गणीतून निवडून येतात. करोडो रुपयांची प्रॉपर्टी, आलिशान गाड्या, एकर दोन एकर वर उभारलेला मोठा बंगला, कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी बुक केलेले ढाबे यातले काहीच नव्हते त्याच्याकडे; होते ते फक्त संघर्षमय जिवन, ते ही स्वतः साठी नाही तर शेतकऱ्यांसाठी. मग काय जनतेने एकदा मनावर घेतले की काय होते याचे उदाहरण म्हणजे नूतन आमदार देवेंद्र भुयार होय.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघात राज्याच्या विद्यमान कृषिमंत्र्यांना एका शेतकऱ्याच्या मुलाने पराभूत करणे हा एक इतिहासाचं म्हणावा लागेल. सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढता लढता ज्या पोरावर आजपर्यंत ८६ गुन्हे दाखल झाले, आज त्याच लोकांनी त्याच्या कामाची जाण ठेवून इथल्या व्यवस्थेलाच त्याला सॅल्यूट मारायला भाग पाडले. लोकशाहीची हीच तर खरी ताकद आहे. बस्स फक्त ती वापरता आली पाहिजे कसल्याही अमिषाला आणि दबावाला बळी न पडता.

या महाराष्ट्रात जोपर्यंत अशी लोक निवडून येतील तोपर्यंत समाजकारणात झोकून देवून काम करणाऱ्या अनेक युवक युवतींना प्रेरणा मिळत राहील. नाहीतर आमदारकी लढवायची म्हणले की एकूण मतदार गुणिले एक हजार एवढी तयारी झाल्याशिवाय विधानसभेच्या आखाड्यात उतरता येत नाही असे पारावर बसलेली माणसं म्हणतात. नेतेगिरीचा आणि पैसेगिरीचा मोठ्ठा वारसा घरूनच असल्यावर निवडून येणे तुलनेने सोप्पे असते पण देवेंद्र भुयार सारखी माणसं याला अपवाद ठरतात.

राजकारणात आपल्याला न आवडणाऱ्या नेत्यांना उगाच पाच वर्ष शिव्या घालत बसण्यापेक्षा. त्यांचा सत्तेचा आणि पैश्याचा माज फक्त तुम्ही तुमच्या हाताच्या एका बोटाने बटण दाबून उतरवू शकता हेच आमदार भुयार यांच्यासारख्या व्यक्तींकडून शिकायला मिळते. नाहीतर आपणच निवडून दिलेली माणसे आपल्या नाकात वेसण घालून तोपर्यंत ओढत राहतील जोपर्यंत ती वेसण आपण स्वतः तोडणार नाहीत. छोट्या दोरीची वेसण पुढे मग मोठ्या तारेची झाली की त्याचे रूपांतर एका मग्रूर नेत्यात होते. ती वेसण सहजा सहजी तुटत नाही. जर ती निवडणुकीच्या माध्यमातून तोडली तर इतिहास तुम्हाला लक्ष्यात ठेवतो.

राजेहो, देवेंद्र भुयार सारखे लढवैय्ये फक्त एका संघर्षात आमदार झाले नाहीत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि मग आमदारकी मिळवली आहे. मुळापासून सुरुवात करा डायरेक्ट विधानसभा लढवून डिपॉझिट जप्त होणाऱ्या लढती देवून काही साध्य होत नाही. लोकांचा विश्वास संपादित करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. ती टप्याटप्प्यानेच व्हायला हवी. तो अपघात नाही हे लक्षात असू द्या. बाकी आमदार देवेंद्र भुयार यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या या यशातून अनेकांच्या स्वप्नांना पंख मिळावेत म्हणून हा लेख प्रपंच. लढो दिल जान से और जितो भी शान से…

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २९ ऑक्टोंबर २०१९