डाॅ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक तथा संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष मा.श्री.संजीवकुमार सोनवणे सर यांचा आज वाढदिवस. आयुष्यात पुस्तकातुन जसे खुप काही शिकायला मिळते तसेच माणसांकडुनही. सरांच्या सहवासात राहणे हा माझ्यासाठी नोकरी पलिकडचा आनंद आहे. आभाळाएवढी उंची गाठलेला हा माणूस अतिशय साधारण परिस्थितीतुन पुढं आला. नोकरी आणि व्यवसायात नशीब आजमावल्यानंतर शिक्षण या शब्दासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावून गोर गरिबांची लेकरं शासकिय महाविद्यालयांत लावण्याचा झपाटाच जणू सरांनी सुरू केला. प्रारंभी एका छोट्याशा खोलीत भौतिकशास्त्राचे शिकवणी वर्ग सुरू केलेल्या सरांचा प्रवास आज तीन महाविद्यालयांपर्यंत येऊन पोहचला आहे. सोनवणे सरांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा परळी, आंबाजोगाई, लातूर, उक्कडगांव आणि उस्मानाबाद या शहरात अजरामर उमटल्या आहेत. त्यांनी कष्टाने उभारलेल्या संकल्प परिवारात आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर शेकडो प्राध्यापक सरांच्या स्वप्नासाठी अहोरात्र झटत आहेत.

“माझ्या संस्थेत काम करत असताना नुसत्या पाट्या टाकायची कामे करू नका. ही संस्था तुमची समजून योगदान द्या; यातुन तुमचाच सन्मान वाढेल” सरांच्या याच विचारांवर आम्ही सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी काम करत आलो म्हणुनच अल्पावधीतच महाराष्ट्रातल्या प्रमुख निवासी महाविद्यालयांच्या पंक्तीत स्वतःच अढळ स्थान निर्माण करू शकलोत. आज आम्हाला समाजात शिक्षक म्हणुन मिळणारा मान, सन्मान सोनवणे सरांची कृपा आहे. वयाची पन्नाशी ओलांडून एक दशक होत आलंय तरी देखील ऐन पंचवीशीतल्या युवकाला लाजवेल असा उत्साह आणि परिश्रम सर घेत आहेत. मातीतली माणसं पाय जमिनीवर ठेऊन आभाळाएवढी उंची का गाठतात याचे उत्तर सोनवणे सरांच्या व्यक्तिमत्वात सापडते.

संस्थेतले हजारो विदयार्थी आज नामवंत वैद्यकिय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेत. यातल्या कित्येकांची परिस्थिती प्रतिकुल होती परंतु सरांच्या मदतीमुळे आज ते शिक्षण पुर्ण करू शकले. आजवर दिडशेहुन अधिक विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सरांनी उचलून शेकडो घरात शिक्षणाचा प्रकाश तेजोमय केला. सरांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी फक्त डाॅक्टर इंजिनिअर होतात असे नाही तर कलेक्टर, आमदार आणि कॅबीनेट मंत्री सुद्धा होतात. सध्याच्या मंत्रीमंडळातले अनेक नामवंत चेहरे विद्यार्थी दशेत सरांचे विद्यार्थी होते ही गोष्ट ते आजही अभिमानाने सांगतात. प्रत्येक प्राध्यापकाला आणि विद्यार्थ्यांला वडीलांसमान प्रेम देणाऱ्या या व्यक्तिमत्वास दिर्घायुष्य लाभो हेच आज त्यांच्या वाढदिनी माझे अभिष्टचिंतन.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०३ सप्टेंबर २०१८
डाॅ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव