आपल्या अक्षयने त्याच्या नावाप्रमाणे काम केलंय, उदाहरणार्थ नेमाडे आणि त्रिज्या या दर्जेदार कलाकृती नंतर त्याला ‘स्थलपुराण’ या चित्रपटासाठी आशिया खंडातील सर्वोत्तम युवा दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला दिग्दर्शक आहे. आशिया खंडातील ७० देशातून आलेल्या तब्बल ३००० हून अधिक चित्रपटातून अक्षयच्या ‘स्थलपुराण’ या चित्रपटाला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’  मिळालाय. युनिस्को , ग्रिफिथ फिल्म स्कुल, एशिया पॅसिफिक अकॅडमी यांच्याकडून हा पुरस्कार दिला गेलाय.

मराठी चित्रपटाला हॉलीवूड टच देणारा दिग्दर्शक, सहज सोप्या गोष्टीचे कॅमेऱ्यातुन अद्भुत दर्शन घडवणारा दिग्दर्शक म्हणजे अक्षय इंडिकर होय. आपल्या सभोवताली घडणारी प्रत्येक गोष्ट हा एक चित्रपटच असतो फक्त त्या दिसलेल्या किंवा सुचलेल्या  गोष्टीला पुन्हा चित्रबद्ध करून दृकश्राव्य माध्यमाच्या अलंकारांनी मढवले की एक दर्जा कलाकृती निर्माण होते. आपल्या मराठी इंडस्ट्रीत अनेक दिग्दर्शक आहेत त्या प्रत्येकांनी त्यांची त्यांची टेस्ट जोपासली तसंच अक्षयने देखील त्याच्या चित्रपटातून प्रेक्षकांना एक वेगळी टेस्ट चाखायला लावली.

अक्षयने वर्ल्ड सिनेमाचा खूप अभ्यास केलाय आणि त्याचा परिणाम त्याच्या चित्रपटांच्या प्रत्येक फ्रेम मधून उमटतो. कथा, पटकथा, चित्रीकरण, अभिनय, संगीत या सर्व गोष्टीवर खूप बारीक लक्ष देऊन तो काम करत असतो. त्याचे चित्रपट डोळ्यांसोबत मनाला आनंद देणारे आणि  मेंदूला विचार करायला लावणारे असतात. जे सहज कुठे दिसत नाही ते दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याच्या फिल्ममेकिंगची ही युनिक फ्लेवर परदेशी ज्युरींना सुद्धा आवडला म्हणूनच सोलापूरसह भारताच्या शिरपेचात यंग सिनेमा अवॉर्ड या मानाच्या पुरस्काराचा तुरा रोवला गेला.

प्रिय अक्षय, तुझ्या डोक्यावरच्या केसांपेक्षाही जलद गतीने त्या डोक्यातल्या जबरदस्त कल्पना वाढत आहेत. दोन्ही असेच वाढू दे, भारी दिसतंय. आता ज्या चित्रपटाची वाट अख्ख जग पाहतंय त्या स्थलपुराणच्या प्रीमिअरची मी वाट पाहतोय. एक जागा ऍडव्हान्स बुक करून ठेव ही विनंती. बाकी ‘इंडिकर’ या नावातच ‘इंडिया’ आहे, तू आपल्या चित्रपट सृष्टीला जगात ‘अक्षय’ करशील याचा विश्वास आहे आणि फक्त सोलापूर, महाराष्ट्रच नाही तर आपल्या भारत देशाला अभिमान वाटेल असे काम करशील याची खात्री आहे. पुनश्च खूप खूप शुभेच्छा भावा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ९ डिसेंबर २०२०