माझा जन्म अनेक गोष्टी करण्यासाठी झाला आहे. आजवर मी जे जे काही केले त्या सर्व कालाप्रकारांना तुम्ही प्रेम दिलंय. व्याख्याने, बॉलपेन चित्र, पुस्तके, कविता, कॅलिग्राफीज या माध्यमातून मी व्यक्त होत आलोय. हे सगळे करत असताना माझ्याकडून आणखीन एक अपेक्षा तुम्ही सतत ठेवत आलात. तीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज मी इंगित प्राॅडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या बॅनरची प्रत्येक कलाकृती तुमचे मनोरंजन करण्यास सज्ज असेल. आजपर्यंत माझ्या डोक्यातल्या कल्पना माईकवर बोललोय, कागदावर लिहिल्यात, चित्रात उतरवल्यात पण आता सज्ज झालोय त्या पडद्यावर साकारण्यासाठी. तूर्तास ‘इंगित’ लक्ष्यात ठेवा, बाकी काळजावर कोरले जाईल याची गॅरंटी देतो.

Ingit Production

काही गोष्टी आपण स्वतः ठरवून करत असतो तर काही गोष्टी समाज आपल्यातला हुनर ओळखून करायला भाग पाडत असतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला चित्रपट निर्मितीत पाऊल टाकायला प्रवृत्त करणारे तुम्हीच आहात. पुस्तकांच्या प्रोमोशनसाठी व्हिडीओच्या माध्यमातून भन्नाट संकल्पना राबवत राबवत हा प्रवास चित्रपट निर्मितीपर्यंत येईल असे कधी वाटले नव्हते पण कदाचित नियतीला माझ्या डोक्यातून काहीतरी उपसून मोठ्या पडद्यावर उमटवायची खुमखुमी आली असावी म्हणूनच इंगितच्या निर्मितीचा विचार माझ्या डोक्यात घातला असावा पण ते काहीही असो आता इंगित एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ठिणगी तर पडलीच आहे यावर फक्त तुमच्या प्रेमाची फुंकर टाकत राहा. हा पेटलेला निखारा कधीच विझणार नाही.

विशाल विजय गरड
निर्माता : इंगित प्राॅडक्शन