स्वतःच्या हिम्मतीवर उगवलेल्या माणसाला उपटून टाकणे सोप्पे नसते. ऑडिओ कॅसेट पासून सी.डी, डि.व्ही.डी, मार्गे फेसबुक, टिक टॉक पर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. आजघडीला इंदुरीकर महाराज हे फक्त व्यक्ती राहिले नसून ती एक इंडस्ट्री झाली आहे. जेव्हा मल्टिमिडीया फोन मराठी माणसाच्या हातात आला तेव्हा त्यात इंदुरीकर महाराजांचे किर्तन, बानुगुडे पाटलांचे व्याख्यान आणि राज ठाकरेंची भाषणे हमखास असायची. सहज एखादा मित्र भेटला तरी त्याच्या मोबाईल मध्ये या तिघांपैकी नविन व्हिडिओ आहे का असल्यास पाठव ब्लूटूथने असे म्हणायचे. काळानुरूपे अनेक गोष्टी बदलत गेल्या ब्लूटूथ ते शेअर ईट, मल्टिमिडीया ते अँड्रॉइड, ऑडिओ कॅसेट ते यू ट्यूब पण या सगळ्या बदलात इंदुरीकर त्यांची क्रेझ कायम ठेवू शकले हे त्यांचे यश आहे.

इंदुरीकरांचे किर्तन टिकात्मक असते, ते तरुणांवर, महिलांवर टिका करतात असा त्यांच्यावर आरोप आहे. पण लोक टिका करून घेण्यासाठी जर त्यांना लाखभर रुपये देऊन बोलावत असतील तर उगाच आपण तोंडाची वाफ बाहेर काढून काय उपयोग आहे का ? याचे चिंतन ज्याचे त्याने करावे. समजा जर त्यांनी किर्तनातूनच मांडलेले विचार लोकांना खटकत राहिले असते तर काळाच्या ओघात ते टिकलेच नसते. जोपर्यंत लोकांना ते व त्यांचे किर्तन आवडत आहे तोपर्यंत इंदुरीकर गाजत राहणार यात वाद नाही. वादातूनच नवनिर्मिती होत असते. वाद होणेही गरजेचे असते. वादात गमावलेल्या गोष्टी सापडतात आणि सापडलेल्या गोष्टी गमावू सुद्धा शकतात याचाही विचार होणे गरजेचे.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांची वेळापत्रके त्यांच्या पदामुळे व्यस्त असतात एकदा का पदाआधी ‘माजी’ नाव लागले की त्यांची व्यस्त वेळापत्रके आरी येतात ही वस्तुस्थिती आहे. पण इंदुरीकरांच्या किर्तनाचे वेळापत्रक पुढची तीन वर्षे व्यस्त आहे कारण एखाद्या कलाकाराची कला हेच त्याचे पद असते त्यामुळे कलेला मरण नाही. इंदुरीकर महाराजांची दुकानदारी (त्यांच्यादृष्टीने) बंद होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी इंदुरीकर महाराज हा ब्रँड त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कौशल्याच्या बळावर निर्माण केला आहे हे विसरू नये. त्या ब्रँडची आजची मार्केट व्हॅल्यू ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला नक्कीच नाही. ज्याला परवडेल व पटेल ते बोलावतील ज्याला नाही पटणार आणि परवडणार ते नाही बोलावतील इतके ते साधे आणि सोप्पे आहे.

टाळ मृदंगाच्या ठेक्यावर खांदे उडवत नाचणे, नसा ताणून बोलणे, दोन्ही गुडघ्यावर दोन हात टेकवून थोडेसे वाकून श्रोत्यांकडे पाहणे, दूरचे श्रोते पाहण्यासाठी उजव्या हाताची झापड डोक्यावर ठेवून पाहणे, बोलताना मध्ये मध्ये शर्टच्या उघड्या दोन गुंड्यातून हात घालून छातीवरील तुळशीमाळा बोटाने सरकवणे आणि उपस्थितांचे लक्ष्य वेधण्यासाठी मधेच मोठ्याने ‘अ..य’ म्हणणे हे सगळे इंदुरीकर फॅक्टरीतुन निघालेले कॉपीराईट हावभाव आहेत. आज सहज जरी फेसबुक किंवा यू ट्यूब वर फेरफटका मारला तरी किर्तनात नव्याने आलेली पिढी इंदुरीकरांना कॉपी पेस्ट करत असल्याचे जाणवेल. अर्थात त्यांनी देखील काळाच्या ओघात टिकून राहण्यासाठी स्वतःची विशिष्ठ लकब निर्माण करणे गरजेचे आहे.

एका किर्तनात इंदुरीकरांनी सम विषम तारखेचा सल्ला दिल्याने ते सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत पण हा विषय खासगीत सर्वात जास्त चर्चिला जातो हेही तितकंच खरं. पोथी, पुराण, अभंगात जरी त्याचा दाखला असला तरी सद्य परिस्थितीत अश्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यास कायद्याने बंदी आहे. बेधडक बोलणे हा इंदुरीकरांच्या किर्तनातला स्वभाव आहे आणि तो ते बदलतील असं वाटत नाही, उलट ‘पटलं घ्या नायतर सोडून देतो’ असे एका वाक्यात ते कांडकं पाडणारं व्यक्तिमत्व आहे.  दैनंदिन आयुष्यात अनेकजण आपल्याला सल्ले देत असतात शेवटी तो वापरायचा का नाही हा आपला अधिकार असतो. चांगले ते घ्यावे, वाईट ते फेकुनी द्यावे आणि पुढे चालावे हेच ध्यानी ठेवावे. हा लेख समर्थनाचा नाही आणि कुणाच्या निषेधाचाही नाही फारतर इंदुरीकरांच्या किर्तन कौशल्याच्या कौतुकाचा म्हणलं तर चालेल. बाकी इंदुरीकर महाराज चुकलेत का नाहीत हे तुमचे तुम्हीच ठरवा, आणि तसेही चुकलेल्या गोष्टी दुरुस्त करून पुढे जाता येतेच की. पूर्णविराम देण्यास अर्थ नाही. ‘अ..य पोऱ्या माईक चालूच ठिव इंदुरीकर पुन्हा येणार…’

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १६ फेब्रुवारी २०२०