आज श्रीगोंद्याचा कार्यक्रम आटोपून परत येताना भिगवनच्या थोडे पुढे आल्यावर उजनीच्या ओस पडलेल्या जलाशयामध्ये आजही डौलाने उभ्या असलेल्या पळसदेवाच्या मंदिराकडे सहज नजर गेली. क्षणाचाही विलंब न करता मी हानमाला गाडी पळसदेवाच्या दिशेने घ्यायला सांगितले. सोबत विरा होती तिनेही या मंदिराबद्दल खुप ऐकुण होती. आम्हा सर्वांच्या उत्सुकतेचा परिणाम म्हणून नियोजित प्रवासाला फाटा देऊन आमची गाडी मंदिराजवळ पोहचली पण मंदीरापर्यंत जाण्यासाठी मात्र थोडा होडीतुन प्रवास करावा लागला. माणसी पन्नास रूपये हेलपाटा अशा दराने आम्ही होडीतून मंदिराच्या आवारात पोहचलो. आजवर जे वर्णन ऐकले होते अगदी तंतोतंत तसेच तिथे पहायला मिळाले.

इंजिनिअरींगची सगळी गुर्मी तिथं गेलंकीच उतरुन जाते. खूप पाऊस झाला म्हणुन वाहुण जाणारी घरे, ईमारती आपण पाहिल्या आहेत परंतु गेली पन्नास वर्षाहून अधिक पाण्याच्या पोटात राहूनही हे मंदिर काल पर्वा बांधल्यासारखंच वाटतंय. ईथला प्रत्येक दगड ज्या पद्धतीने घडवलाय त्याला तोड नाही. आज आत्याधुनिक मशिन वापरूनही अशी कलाकुसर करणे अशक्य आहे. दगड तर टिकतातंच हो वर्षानुवर्ष पण पळसदेवाचे शिखर हे विटांनी बाधलेले आहे. ईतके वर्ष पाण्यात राहूनही या विटांची माती नाही झाली हे आश्चर्यच. पुरातन वास्तू पाहायची आवड असणाऱ्यांसाठी तर पळसदेवाचे मंदिर म्हणजे पर्वनीच आहे.

सध्या कडक उन्हाळ्यामुळे उजणी धरणाची पाणी पातळी जरा जास्तच खालावल्याने पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर पुर्णपणे उघडे पडले आहे. मंदिराच्या आवारात सतीशिळा, वीरगळ, घोडा, मारुतीची मूर्ती, दिपमाळेचे अवशेष, भक्कम विटांची ओवरी अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. विटांच्या ओवऱ्यांचा नेमका उपयोग मला माहित नाही पण सध्या त्यात भेळ, पाववडा वगैरे विकणारे बसतात. सध्या या मंदिरात मुर्ती किंवा पिंड नाही ती स्थलांतरीत करण्यात आली आहे. पण देवाच्या देवपणासोबत हे मंदिर बांधण्यासाठी जे हात झटले असतील आणि ज्या मेंदूने काम केले असेल ते सर्वजन देवापेक्षा साधे नव्हते याचा साक्षात्कार हे मंदिर पाहूण होतो.

बाकी ‘इथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे’ असे बोर्ड वगैरे नसल्याने तुम्ही मनमुराद फोटोशेशन करू शकता. फोटोची हौस नसणारा सुद्धा या उजनीच्या उघड्याबंब जलाशयाचे आणि त्यात असणाऱ्या या मंदिराचे पाच दहा तरी फोटो काढेलंच. या लेखासोबत जोडलेले माझे आणि विराचे सुंदर फोटो टिपल्याबद्दल निष्णात फोटोग्राफर हनुमंत हिप्परकर यांचे आभार याहून महत्वाचे म्हणजे आमच्या या फोटोची ब्रॅण्ड व्हॅल्यू खऱ्या अर्थाने वाढवलेल्या त्या मंदिराच्या सर्व स्थापत्यतज्ञांना शतशः नमन करून आभार. या अज्ञात स्थापत्यतज्ञांना क्रेडीट द्यायचं होतं म्हणूनच हा लेखप्रपंच. मंदिराचा दगड कोरून एकावर एक लावताना जी कुणी माणसं झटली असतील त्यांची ईतिसाने नोंदही ठेवली नाही परंतु त्यांच्या कामाच्या पाऊलखुणांसोबत फोटो काढूण आम्ही आजही शायनिंग मारतोय यातच त्यांचे मोठेपन.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० मे २०१९