प्रथतः तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! कोरोनाच्या या अंधारमय वातावरणात आपण दिवा लावायला सहीसलामत राहिलो हेच सर्वात मोठं गिफ्ट आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हाट्सएपवर माझ्याशी कनेक्ट राहिलेल्या मित्रांना मी कधीच आभासी मानत नाही. प्रत्यक्ष भेट सोडली तर आपण एकमेकांना खूप जवळून ओळखत असतो, सुख दुःखात सहभागी होत असतो. याचे कितीतरी अनुभव मी रोजच्या आयुष्यात घेत आलोय. व्याख्यानांमुळे उभा आडवा महाराष्ट्र फिरलो त्यामुळे मित्र संख्येचा गुणाकार झाला. सोशल मिडियावरिल लेख प्रपंचामुळे त्यांची बेरीज वाढतच गेली. काहींना मी प्रत्यक्ष भेटलो असेल, काहींना पुस्तकातून तर काहींना व्हिडीओ मधून.

जेवढे प्रेम तुम्ही माझ्यावर एक वक्ता म्हणून, लेखक म्हणून, कलाकार म्हणून करता तेवढेच प्रेम तुमचा मित्र म्हणून मीही तुमच्यावर करतो पण कधीकाळी तांबूल्यातल्या पाण्याएवढा असलेला मित्रपरिवार आता तळ्याएवढा झाल्यामुळे ते प्रेम सर्वांवर शिंपडणे जरा कठीणच जाते तरीही जमेल तसा माझा प्रयत्न सुरूच असतो. आपण कधी भेटलो असोत नसोत तुम्ही माझ्यासाठी नेहमीच खास आहात. तुम्हा प्रत्येकाच्या घरात ज्ञानाचा, समृद्धीचा, भरभराटीचा आणि उत्तम आरोग्याचा दिवा लागो याच माझ्या तुम्हाला दिवाळी शुभेच्छा. बाकी विचारांचा फराळ पोहोचवत राहील घरपोच, असेच प्रेम वाहुद्या आणि पाठबळाचा दिवा सदैव तेवत राहू द्या.

तुमचा दोस्त : विशाल गरड
दिनांक : १३ नोव्हेंबर २०२०