उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच ती धावतेय रस्त्यावरून काळ्या आईच्या पोटातुन पाणी काढायला. आईची लेकरे सज्ज झालीत भुईची चाळण करायला. मातीबद्दलच्या प्रेमाचे झरे आटलेली माणसं पुन्हा सज्ज झालीत मातीच्याच पोटात लोखंडी पाईप घालुन पाण्याची वाट बघत बसायला. पावसाचा एक थेंब सुद्धा जिरवण्यासाठी प्रयत्न न केलेल्यांना खरंच त्या मातीत आपोआप मुरलेलं पाणी उपसायचा अधिकार उरतो का? आभाळातुन पडणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन नाही केलं की जमिनीतुन पाणी काढण्याच्या खटाटोपी सुरू होतात. बोअर पाडायला हजारो रूपये आणि विहिर खांदायला लाखो रूपये खर्चणारे पाणी मुरवायला किती रूपये खर्च करत असतील बरं ?

काही भाबडी जनता तर अजुनही पाण्याची निर्मिती ही जमिनीच्या पोटातच होत असते अशा गैरसमजात जगत असतात. पाणी लागलं तर पेढे वाटतील आणि नाही लागलं तर नशिबाला नायतर जमिनीलाच दोष देत बसतील. जमिनीत बोअरचा पाईप घुसण्याचा वेग हा पावसाचे पाणी मुरण्याच्या वेगापेक्षा पन्नासपट जास्त असतो हे लक्षात नसते त्यांच्या. ढगातुन पडलेले पाणी वाहुण जाताना कुणाचं किंचीतही लक्ष नसतं, पण नद्या नाले कोरडे पडले की बोअरवेलच्या गाड्यांचा सुळसुळाट सुटतो. अरे जमिनिला बांध असतात म्हणुन काय झऱ्यांना सुद्धा असावेत काय ? त्यांना माहित नसते आपल्या डोक्यावर कुणाचं शेत आहे ते आणि आपण वर भांडत बसतो अमक्याने बोर घेतलं म्हणुन आमच्या हिरीचं किंवा बोरचं पाणी गेलं.

ते आभाळातुन पडलेलं पाणी मातीत मुरताना एक सुगंध निर्माण करून जाते आपण मात्र ते उपसताना धुरूळा करून टाकतो. मातीचे उदर लय मोठ्ठं हाय ओ ! पण आपलं मुरवणं कमी आणि उपसणंच जास्त झाल्याने पाच-पन्नास फुटावर लागणारं पाणी आता पार पाच-सहाशे फुटापर्यंत खाली गेलंय. याहीपेक्षा माणसाचे पाण्याचे लालच मात्र हजार फुटापेक्षा जास्त खोल गेलंय याची चिंता वाटतेय. असो, आत्तापर्यंत खुपदा लिहिलं गेलंय, बोललं गेलंय, सांगितलं गेलंय तरी सुद्धा पुन्हा पुन्हा लिहू वाटतंय, बोलू वटतंय, सांगू वाटतंय “पाणी आडवा, पाणी जिरवा” आणि याच्या पुढंच म्हणजे “आधी पाणी आडवा ते जिरवा आणि मगच बोअरवेलच्या गाड्या मिरवा”

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०६ फेब्रुवारी २०१९