रविवारचा विरंगुळा म्हणुन राहुलच्या टपरीवर बसलो होतो. माझ्या आधीच तिथल्या बाकड्यावर बसलेल्या एका मित्राला मी सहज विचारलं काय मग कुठंवर आलंय ? बस्स एवढ्याच प्रश्नावर तो उत्तरला. “लग्नाचं आवघडं हुन बसलंय सर. पाहुणे रावळे म्हणत्यात नोकरी पायजे, बापजाद्याचा यवसाय पुढं न्हेत; आम्ही काय नोकरीच्या नादी नाय लागलाव, आता आमच्या सारख्या बलुतेदाराला कोण देणारं पोरगी. अनाथ आश्रमात सुद्धा जाऊन आलो पण ते म्हणत्यात पहिल्यांदा पोरीच्या नावाने जमिन घरदार लिहून द्या, लिहून बी दिली आस्ती वं पण जर न्हाय नांदली अन् गीली निघून तर काय रस्त्यावर ययचं का मग. घरात चार पाच पुती गहू जवारी पडुन हाय, दोन ठिकी तांदुळ हाय, हिकडं तिकडं शेतावर गेलं की माळवं देत्यात लोकं, शेंगदानं आन् तेल मिठाला लागतंयच काय सांगा की. पण नोकरीच पायजे म्हत्यात आता तुम्हीच सांगा सर कसं करायचं ?

खरंच हा प्रश्न खुप गंभीर झालाय. प्रत्येकाला नोकरदार मुलगा हवा आहे. करोडोच्या या देशात करोडो नोकऱ्या नाहीत हे वास्तव आहे. तरीसुद्धा नोकरीचा अट्टाहास कमी होत नाही. अदयाप लग्न न झालेली पण पस्तीशी ओलांडलेली अनेक पोरं आजही आपल्या सभोवताली दिसतील त्यांची उत्तरेही यापेक्षा वेगळी नसतील. आधिच मुलींची संख्या कमी त्यात त्यांच्या अपेक्षा जास्त अशात बलुतेदारीची परंपरा जोपासलेल्या समाजातिल मुलांनी करायचं तरी काय? लहान सहान व्यवसाय करणाऱ्या, शेतीवाडी नसलेल्या, ड्रायव्हरकी करणाऱ्या मुलांना स्थळं येणंच बंद झालंय. कोणताच नवरा बायकोला कधी उपाशी मारत नसतो. ईथे भिकारी सुद्धा बायकोला दोनवेळचे जेवन देऊ शकतो. उदरनिर्वाहासाठी जे लागतं ते सगळीच कष्टाने कमऊ शकतात पण ऐशोआरामासाठी मात्र जमिन-जुमला, नोकरी-धंदा पाहिजेलंच असा समज झालेल्यांची ईच्छा आपण बदलू शकत नाहीत. बस्स त्यांच्या अपेक्षेत बसणे हेच ध्येय ठेवण्याशिवाय पर्याय नाही.

पोऱ्याहो, धमण्यात रक्त उसळतंय तोवर हात पाय हालवा. मेंदु विचार करतोय तोवर सेटल व्हा, तुमचं स्वतःचं अस्तित्व दिसल्याशिवाय कोणताच सासरा तुम्हाला पोरगी नाही देणार. यशाच्या व्याख्या बदलत आहेत त्यानुसार आपणही जगरहाटीच्या या स्पर्धेत काहीतरी करायला हवं. जावई काय करतंय असं कुणी विचारल्यावर सांगायला सासरेबुवाला अभिमान वाटावा असं काहीतरी करून ठेवा नाहीतर “पोरगी देतं का कुणी पोरगी, एक बेरोजगार बायको वाचुन, काम धंदा नोकरी न बघता मोक्कार बोंबलत फिरणाऱ्या या एकटेरावास कोणी पोरगी देतं का ओ पोरगी ? असं म्हणायची वेळ येईल.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ नोव्हेंबर २०१८