माझ्या आजवरच्या सगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलाय. माझ्या सारख्या युवा लेखकावर तुम्ही केलेल्या प्रेमामुळे आजवर माझा लेखप्रपंच पाच पुस्तके प्रकाशित करण्यापर्यंत जाऊन ठेपला. ‘हृदयांकित’ आणि ‘रिंदगुड’ या दोन्ही पुस्तक प्रकाशनावेळी बार्शीतले सर्वात मोठे यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह तुडुंब भरून तुम्ही दिलेला प्रतिसाद आजीवन स्मरणात राहील असाच होता.

बाटुकचे प्रकाशन सुद्धा तुमच्या प्रेमाच्या गर्दीत करायची इच्छा होती पण कोविड नियमावलीमुळे तुम्हा सर्वांना जाहीर निमंत्रण द्यायची मनापासून इच्छा असूनही ते करता येत नाही. पुस्तक प्रकाशन हा एक वैचारिक उंची असलेला कार्यक्रम असतो उलट अशा कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावायला हवी, आयुष्य बदलून जायला एखादे पुस्तकच काय पण त्या पुस्तकातले एखादे वाक्य देखील पुरेसं असतं. म्हणूनच मी प्रकाशन सोहळे करीत आलो. पण सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही कार्यक्रमास मोठे स्वरूप देणे संयुक्तिक ठरणार नाही म्हणूनच बाटुकचा प्रकाशन सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या आणि निमंत्रितांच्या  उपस्थितीत छोटेखानी स्वरूपात पार पाडत आहे.

मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच महाविद्यालयात माझ्या एका तरी पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी इच्छा होती. बाटुकच्या निमित्ताने ती पूर्ण होत आहे आणि विशेष म्हणजे श्री शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर कॉलेज जीवनातले पाहिले लेक्चर मी ज्या हॉलमध्ये अनुभवले त्याच हॉलमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. त्या हॉल मधील बेंचवर बसून भविष्यात आपण कधी एखादे पान तरी लिहु असे वाटले नव्हते तिथेच माझे पाचवे पुस्तक प्रकाशित होतंय. कर्मवीर मामांच्या संकुलात संपन्न होणारा हा क्षण आणि सोहळा सदैव स्मरणात राहील. बाकी तुमच्या आशिर्वाद, प्रेम आणि सदिच्छांचा मी सदैव भुकेला.

विशाल गरड
दिनांक : ३० जुलै २०२१