जेवण झाल्यावर सहज कुल्फी खाण्यासाठी गाड्यावर गेलो. इन बिन पंधरा सोळा वर्षाचं पोरगं मावा कुल्फी विकत होतं. अशी पोरं दिसली की माझा नेहमीचा प्रश्न असतो. “अरे शाळेत जातो का नाही” हाच प्रश्न मी त्यालाही विचारला तो म्हणला “सर, शाळेत न जाताच मला वाचायला येते. आमचे वडील पण नाही शिकले मी पण नाही. आमच्यात लहानपणापासूनच या धंद्यात टाकतात. शिजन मध्ये महिना लाख रुपये कमावतो आणि इतरवेळी महिना चाळीस पन्नास हजार कमावतो बघा. शिकत बसलो असतो तर आजूनबी नोकरी शोधत बसलो असतो. त्यापेक्षा हेच बरंय की”.

त्याच्या या उत्तरावर खरच थोडा विचार करावासा वाटला. नोकरीचा काळ आता संपत चालला आहे असे वाटतेय. मागच्या पाच वर्षात किती सरकारी नोकरीसाठी भरती निघाली ? जरी एखाद दुसरी सैनिक वा पोलीस भरती निघालीच असेल तर मोजक्या जागांसाठी होणारी लाखोंची गर्दी पाहिली की कुल्फीवाल्याचा निर्णय योग्य वाटू लागतो. आयुष्यात कमावण्याचा काळ असतोच किती ? ऐन तारुण्याचा काळ आजची पोरं नोकरी मिळेल म्हणून अभ्यासात खितपत घालवत आहेत. पण चार दोन पोरांचे यश सोडले तर बाकीच्यांचे काय ? हा खूप मोठा प्रश्न आहे. शिक्षण घेता घेता वयाची पंचविशी संपते, तिथून मग नोकरीसाठीचा स्ट्रगल चालू होतो कुणाच्या नशिबी दोन वर्षे, कुणाच्या नशिबी पाच वर्षे तर कुणाच्या नशिबी सात वर्षे. यातूनही जर कुठे नाही चिटकला तर मग त्याला नैराश्य चिटकते. हल्ली कमावता असला तरच मुली मिळतात. नुसत्या डिग्र्या पाहून पोरी द्यायचा काळ सुद्धा संपला आहे.

शिक्षण भरपूर झालेले असते, तो नोकरीसाठी अभ्यास करतोय हे सगळ्या गावाला माहित झालेले असते. म्हणूनच पुन्हा गावाकडे जाऊन छोटा मोठा व्यवसाय करायला त्याला लाज वाटते. पण त्याच्यासोबतची नापास झालेली पोरं गावात टपऱ्या टाकून, वडा पावचा गाडा टाकून आज दिवसाला हजार रुपयांचा मेळ लावतात. मग खूप शिकल्याने आणि अभ्यास केल्याने पोरांचा फायदा झाला का तोटा ? फक्त सर्टिफिकेटवर नोकरी मिळण्याचा काळ आता गेला; तेव्हा जर नोकरीचे काही चलींतर दिसत नसल तर काही ना काही कौशल्य विकसित करून दिवसाकाठी शे पाचशे रुपयाचा मेळ लावता आला पाहिजे. शिकाल तर टिकाल यासोबतच आता कमवाल तर टिकाल हे ही तितकच खरं झालंय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०८ डिसेंबर २०१९