#भाग – १
कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणातही लॉक डाउन मध्ये काही माणसे विनाकारण का बरे बाहेर पडत असतील ? याची उत्तरे खालील वाक्यात सापडतात. आपल्या टिपिकल मानसिकतेत या गोष्टी घुसल्यानेच बाहेर पडण्याचा कॉन्फिडन्स वाढला असावा.

१) आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात किंवा गावात अजून एकपण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मग कश्याला भ्यायचंय.

२) अरे मरणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे रे आपल्याकडे.

३) जरी हुकून चुकून आपल्याला झालाच तर आपण बरे होऊ. आता एवढीजण झालीच की बरी. त्यात काय एवढं

४) आपल्या जवळ किंवा घरात कुणी मुंबई पुण्याहून आणि फॉरेनहुन आले नाही.

५) किराणा रोज मिळणार आणि भाजीपाला सुद्धा रोज मिळणार मग कश्याला आठवड्याचा भरायचा त्यानिमित्ताने रोज फेरफटका मारता येतो.

६) ऊन जास्त असल्यामुळे आपल्याकडे काही तो व्हायरस जिवंत राहत नसतोय.

७) एकशे पस्तीस कोटी लोकांपैकी फक्त हजार जणांना झालाय ते हजार दवाखान्यात आहेत मग आपल्याला कश्याला होतंय कोरोना.

८) गावाकडं नस्तय बाबा येत ती कोरोना का फिरुणा. आपुन गावरान माणसं हाव. लय डेंजर आस्ताव आपुन.

९) सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आपले मित्र आहेत कोरोना झाला तर ते आपल्याला प्रायोरिटी देतील.

१०) चला मास्क लावून बाहेर. चौकात बंदोबस्ताला उभारलेले साहेब आपले दोस्त आहेत ते नाही काठी मारणार.

११) मी रोज हँडवॉशने हात धुतो, सॅनिटायसरच्या सात बाटल्या आहेत आपल्याकडे.

१२) काय नाही रे मिठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या सारख्या तो कोरोना बिरोना नाय काय वाकडं करत

या व अश्या अनेक गोष्टीमुळे आपण कॉरोनाला गांभीर्याने घेत नाही आहोत. सरकार फक्त नियम करू शकते पण स्वतःच्या जिवाची काळजी स्वतःच करायला हवी.

#भाग – २

आता मी काय म्हणतोय ते जरा वाचा आणि गप्प घरात बसा योगायोगाने पुढील पंधरा दिवसात जर आपण कोरोनाला हद्दपार करू शकलो तर लॉक डाऊन लवकर संपेल अन्यथा ते आणखीन दोन महिने वाढेल.

१) कोरोना व्हायरस आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात गावात नाही असे फक्त टिव्ही वरच्या बातम्या बघून ठरवणे चुकीचे आहे. मुळात टेस्ट किती जणांच्या झाल्यात, लक्षणे किती जणांना आहेत याची आकडेवारी नाही.

२) जेव्हा आपल्या घरातील कुणी कोरोनामुळे दगावेल तेव्हा पण असंच म्हणणार आहोत का आपण.

३) कोरोना बरा होणे हे ज्याच्या त्याच्या इम्युनीटी सिस्टिम वर अवलंबून आहे. वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि लहान मुले  यांना जास्त धोका आहे मग यापैकी आपल्या घरात कुणीच नाही का ?

४) कोरोना आता चौथ्या स्टेजला गेलाय म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड त्यामुळे तो कुणालाही असू शकतो. सुप्तावस्थेतील रुग्ण ओळखणे कठीण आहे.

५) सरकारने तुमच्या काळजीपोटी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत त्याचा गैरफायदा घेणे चुकीचे आहे.

६) तो व्हायरस उन्हात जिवंत राहत नसता तर पहिल्या आठवड्यातच नामशेष झाला असता पण तसे न होता हजारोंना पछाडलय त्याने.

७) मुळात आपल्याकडे टेस्ट किट आहेतच किती त्यापैकी टेस्टिंग झाली कितीजणांची. लागण झालेले पण टेस्ट ना केलेले कितीतरी रस्त्यावर फिरत असतील ही शक्यता नाकारता येणार नाही

८) गाव, शहर, जात, धर्म, रंग, लिंग असा कसलाही भेदभाव कोरोना करत नाही. प्रत्येक मानवास त्याची लागण होऊ शकते

९) दहा लाख लोकांमागे एक व्हेंटिलेटर आहे आपल्याकडे, कोरोनाने मेलात तर मित्र वगैरे सोडा घरचे पण मातीला येऊ शकणार नाहीत.

१०) ओळखीचा चुकीचा फायदा घेऊ नका. सरकारच्या सूचनांचे पालन करा पोलिसांना आणि डॉक्टरांना सहकार्य करा.

११) फक्त हात धुतला म्हणजे झालं असे नाही तो व्हायरस आपल्या कपड्यांवर, पादत्रानांवर, हातातल्या पिशवीवर, पैशांच्या नाण्यांवर, नोटांवर इथे कुठेही असू शकतो.

१२) हे असले वॉट्सएपवर आलेले उपाय जर खरे असते तर अर्थव्यवस्था धोक्यात घालून लॉक डाऊन करायला काय जगाला वेड लागले आहे काय.

गप्प घरी बसून राहा, भाजीपाला, फळे, औषधे घेण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन मग बाहेर पडा. एक हेल्पट्यात शक्यतो पुढील एक आठवड्याचा माल विकत घ्या. तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या. जनहित मे जारी.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३१ मार्च २०२०