कागरचा ट्रेलर बघून वाटले होते की ही एक भन्नाट लव्हस्टोरी असेल पण प्रत्यक्षात मात्र हा संपुर्ण चित्रपट राजकारणावर आधारीत आहे. म्हणूनच फक्त ट्रेलर पाहूण चित्रपट पहायला गेलेल्या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे का बरं? शांतीत क्रांती करणारे नेते, दाखवायचा चेहरा वेगळा आणि वागण्याचा चेहरा वेगळा असणारे पुढारी, सत्तेसाठीचा रक्तपात, डावपेच, कुरघोड्या, ऊसाचा प्रश्न आणि सोबतच हिरोच्या वडीलांच्या खुनाचा बदला असा हा चित्रपट आहे. पोरीला राजकारणात आणण्यासाठीचा बापाचा (शशांक शेंडे) प्रयत्न किती पद्धतशीर असतो याचे उत्तम चित्रिकरण मकरंद सरांनी केलंय. नेमकं राजकारण हाच केंद्रबिंदू माणून चित्रपट बनवलाय.

युवराज आणि राणीची लव्हस्टोरी कधी सुरू होते आणि कधी संपते हे कळतच नाही. त्यांची लव्हस्टोरी आमटीतल्या कडीपत्यासारखी वाटते. संपुर्ण कथानकात ती फक्त वरवर तरंगताना दिसते. काही काही सिन पाहताना डिक्टो सैराट ईफेक्ट जाणवतो. विशेष करून रिंकूला घेऊन पळताना आणि तीला पोलिस स्टेशनमध्ये रडताना पाहूण तर खुपच जाणवते. विठ्ठल काळे याने भाऊड्याची भुमिका मुख्य अभिनेत्यापेक्षा वरचड साकारली आहे. चित्रपट पाहिल्यावर वाटतं विठ्ठलच मुख्य अभिनेत्याच्या भुमिकेत असायला हवा होता. बाकी पोलिस म्हणुन घेतलेले झेंडे (तुला पाहते रे) आणि राणीची आई म्हणुन घेतलेली गुरूनाथची आई (माझ्या नवऱ्याची बायको) मालिकांतुन घराघरात पोहोचल्यामुळे या चित्रपटात त्यांना पाहुण मालिकांचाच फिल येतो त्यांच्या जागी नवोदित व्यक्ती असत्या तर ते अजुन जास्त वास्तववादी वाटलं असतं.

मकरंद सरांनी युवराज आणि राणीच्या लव्हस्टोरीला अजिबात तडका मारला नाही. रिंकुची एन्ट्री दमदार दाखवता आली असती पण आरशासमोर कानातलं घालताना रिंकु एकदमच समोर येते. सैराटनंतरची तीची अशी एन्ट्री भावली नाही. कागर पाहिल्यानंतर रिंकूच्या अभिनयाला आता प्रौढत्व आल्याची जाणिव होते. कागर चित्रपटासाठीच्या लोकेशन्स मकरंद माने यांनी खुप सुंदर निवडल्यात. प्रत्येक चित्रपटातुन शेवटी काहीना काही शिकायला मिळत असते. कागर मधून मात्र ‘पेरलं तेच उगवतं’ हे शिकायला मिळाले. दिग्दर्शक मकरंद माने यांना या चित्रपटातून जे सांगायचे होते ते त्यांनी खुप व्यवस्थित मांडलंय. सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. पार्श्वसंगितही सुमधूर आहे. हे सगळं असतानाही राणी आर्चीला ओव्हरटेक करू शकली नाही हे जाणवते. शेवटी चित्रपट म्हणजे एक तपश्चर्याच असते. शेकडो गोष्टींचा काला करून ही कलाकृती आपल्या समोर येत असते एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून आपण व्यक्तही व्हायला हवंच. पर ‘हर किसीका एक अपना अपना अंदाज और नजरीया होता है’ मला पाहूण जे वाटलं तेच लिहीलंय कदाचित तुम्हाला वेगळं वाटू शकतं पण त्यासाठी कागर एकदातरी पहायलाच हवा हे नक्की. ऑल द बेस्ट मकरंद सर, रिंकू अॅण्ड विठ्ठल.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २८ एप्रिल २०१९