यसनचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी अगदी नावाप्रमाने कथेला न्याय दिलाय. यातले बहुतांशी प्रसंग वास्तव असल्याने ते थेट काळजाला भिडतात या कादंबरीतली कथा आमच्या पांगरी भागातुनच सुरू होत असल्याने बोरगाव ते पुणे व्हाया कळंब या प्रवासातला प्रत्येक टप्पा माझ्या डोळ्याखालुन गेला आहे. त्यामुळे वाचताना गावं, शेत, नद्या, वाड्या, वस्त्या, बाजारपेठा, शाळा, कार्यालये, रस्ते जस्सेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. त्यात पुन्हा कादंबरीचा लेखकच जिवाभावाचा दोस्त म्हणल्यावर त्यातला वामन म्हणजे जणू ज्ञानेश्वरच आहे असं समजून वाचायचो. पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंत या कादंबरीने मला खिळवून ठेवलं.

कादंबरीतला नायक वामन सोनवणेचा आईच्या पोटात असताना सुरू झालेला संघर्ष शिक्षण घेण्यापासुन नोकरी लागल्यावरही संपत नाही. या संपुर्ण प्रवासात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रूपात सर्वसामान्यांचे रक्त शोषण करणाऱ्यांवर लेखकाने आसुड ओढलाय. यसन वाचताना वाचण्याचे व्यसन लागल्याशिवाय राहत नाही. आपली बोली भाषा असल्याने ती थेट काळजातून वाचली जाते. उसाच्या फडात जन्मलेला वामन अनेक कष्ट घेऊन शिक्षणाच्या फडात स्वतःला सिद्ध करतो पण तरीही अखेर त्याच्या संसारावर कोयता चालतोच. उस तुटला तरी त्याची मुळं अजुन जिवंत आहेत आणि ती पुन्हा नवा फुटवा धारण करायला सक्षम आहेत हे या कादंबरीतुन उमगतं.

या पुस्तकाच्या अकराव्या धड्यात कादंबरीच्या नायकाने अंगात आलेल्या बाईला काटा टोचवून अंधश्रद्धेचा फुगा फोडला आहे. बाराव्या धड्यात आश्रूबा आणि परसूबा भिंत अंगावर पडून मेल्यावर. नायकाच्या मामाच्या घराची झालेली अवस्था वाचताना मन सुन्न होतं. लहानपणी राकेलवरील बॅटरीच्या उजेडात शाळेत जाणाऱ्या वामनने मोठ्यापणी शब्दांच्या उजेडात त्याच्या सारख्या हजारो पोरांचे जगणं मांडलंय. रंग आणायला पैसं नाहीत म्हणुन करंडातलं कुंकु पाण्यात कालवायचं आणि तव्याचं काळं काढायचं, नाना आजारी पडल्यावर डाक्टरला द्यायला वीस रूपये कमी पडलं म्हणून चाबूक गहाण ठेवावा लागला होता. हे संवाद डोळ्यातुन पाणी काढल्याशिवाय राहत नाही. कादंबरीच्या सुरूवातीलाच एकोणीस आणि वीस पानावरचा धनाप्पाचा अक्सिडेंट हुंदकाच तयार करतो. पुढे डोळयातले अश्रू पुसत पुसतच काही भाग वाचावा लागतो.

वामनने शिक्षणासाठी टमटमवर किन्नरकी, कापडाच्या दुकानात सेल्समन, एस.टी.डी मध्ये ऑपरेटर अशी कामे केली, शाळेवर कथा कथनांचे कार्यक्रम केले. पुण्यातल्या वसतीगृहात प्रवेश मिळवण्यासाठी वामनने केलेली धडपड वाचणाऱ्याच्या धमन्यात उत्साह भरते. प्रेम करणाऱ्या मुलीच्या घरी लग्नासाठी मागणी घालायला गेल्यावर जेव्हा तीच्या घराचे बाथरूम आपल्या घराएवढं दिसतं. अशातही हिम्मतीने लग्नासाठी तीचा हात मागण्याचे सामर्थ्य वामन मध्ये येते. परिस्थिती प्रेमाच्या आड येत नाही पण लग्नाच्या मात्र नक्कीच येते. वामनचे आईवडील ऊसतोड कामगार असतानाही आंतरजातीय विवाहाला परवानगी देतात परंतू त्याच्या प्रेयसीचे वडील मात्र तू आमच्या स्टेटसचा नाही असे म्हणुन सोयरिक नाकारतात तेव्हा लेखकाने यसन मध्ये कोण सुशिक्षित आहे ? कोणावर पारंपारिक विचारांचा पगडा आहे ? कोण सुधारलंय ? पैसा आणि साधन संपत्ती गोळा करणे म्हणजेच सुधारणा आहे का ? एवढ्या मोठ्या घरात कर्त्या व्यक्तीशिवाय कुणालाच विचार मांडता येत नाहीत हेच स्वातंत्र्य आहे काय ? मग काय कामाची ही श्रीमंती ? असे विचारलेले सवाल विचार करायला भाग पाडतात.

संपुर्ण कादंबरीतली तुमच्याशी शेअर करण्यासारखी अनेक वाक्य आहेत पण ती सगळीच इथे लिहिली तर वाचण्याची मजा निघून जाईल परंतू त्यातली निवडक दोन वाक्य मात्र इथे मुद्दामून नमूद करतोय कारण ही दोन वाक्य म्हणजे यसन या कादंबरीचे अतिसंक्षिप्त रूप आहेत असे मला वाटते.

१) “दुसऱ्याच्या फडातील ऊस तोडता तोडता आन् त्याचं पाचट काढता काढता आमच्या आयुष्याचं पाचट कवा झालं ते कळलं नाही”.

२) “धंदेवाल्या गाडीवानाच्या हातात यसन गेल्यावर बैलाच्या नाकातोंडातून रगत आल्याशिवाय राहत नाय”.

अर्ध्या कादंबरीचे सार पहिल्या वाक्यात सामावलंय तर अर्ध्या कादंबरीचे सार दुसऱ्या वाक्यात सामावलंय. यसन वाचल्यानंतर यातला प्रत्येक प्रसंग तुमच्या ह्रदयात सामावतो आणि मग तो मेंदुला ढुसण्या देऊन विचार करायला भाग पाडतो त्यातुनच मग अशी परिक्षणं जन्म घेतात. बाकी मी तर छोटा ठिपका आहे. लय रथी महारथींनी यसनवर लिहिलंय. मी फक्त थोडा व्यक्त झालोय एवढंच. सरतेशेवटी एवढंच म्हणेल की आपल्याही हातात कधीन कधी कुणाच्याना कुणाच्या यसनी येतील तेव्हा हातातला कासरा कधी ढिल्ला सोडायचा आणि कधी ओढून धरायचा एवढं जरी समजलं तरी ‘यसन’ वाचल्याचे सार्थक होईल.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ जुलै २०१९