ज्ञान आणि अनुभवाच्या उंच शिखरावर बसून सामाजिक भान जिवंत ठेवून काम करणारे प्रख्यात कॅन्सर तज्ञ डॉ.राहुल मांजरे यांची आज सदिच्छा भेट झाली. आजवर आम्ही फक्त फेसबुक मित्र होतोत पण काही दिवसांपूर्वी डॉक्टर साहेब एवढे व्यस्त असतानाही त्यांनी माझ्याकडे वाचनाची इच्छा व्यक्त केली होती जी मी त्यांना माझी दोन पुस्तके भेट देऊन पुर्ण केली. त्याबदल्यात एक प्रचंड भारी माणूस माझ्या मैत्र यादीत समाविष्ट झाला. मुंबईच्या टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मध्ये अनुभव घेतलेला हा डॉक्टर सध्या बार्शीत रुग्णसेवा करतोय.

MBBS, MS, DNB, FICRS, FALS, UICC FELLOW TATA Hospital Mumbai, ESSO Certified Breast Oncoplastic surgeon (London) Robotic & Laparoscopic GI Oncosurgeon, Head & Neck Thorasic GI Oncosurgeon, हे एवढं शिकलेला माणूस मुंबई,पुणे आणि विदेशातील भल्या मोठ्या संधी सोडून बार्शीत का बरं आला असावा ? तर त्याचे उत्तर त्यांच्या सर्वसामान्य रुग्णांबद्दलचा दृष्टीकोन, आपल्या अगाध ज्ञानाचा फायदा गावकुसातील गरिब रुग्णांना व्हावा हा विचार आणि गोरगरिबांचा जीव वाचवण्याच्या धडपडीत सापडते.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईत नोकरी करत करत बार्शीसाठी ते आठवड्यात फक्त दोन दिवस देत होते. हळू हळू बार्शीतील ओपीडी वाढत गेली आणि आता डॉक्टरांनी बार्शीतील परांडा रोडला साईसंजीवनी हॉस्पिटलची उभारणी करून तिथे मुंबई सारखे अद्ययावत ऑपरेशन थेटर निर्माण केले ज्यातून शेकडो रुग्ण कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारातून बरे होऊन बाहेर पडले. मृत्यूलाही हरवण्याचे सामर्थ्य या जगात सर्जन लोक ठेवतात म्हणूनच मृत्यूपासून वाचलेल्या माणसांसाठी हेच देव असतात. देवपण लाभून देखील या माणसाचे पाय फक्त जमिनीवर नाही तर जमिनीच्या आत घट्ट रोवले गेले आहेत.

“सर, माझ्याकडे एक कॅन्सरग्रस्त स्त्री आली होती, तिला एका रुग्णालयाने ती फक्त एक महिना जिवंत राहील असे सांगितले होते. पण जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिचे ऑपरेशन करण्याचा मी निर्णय घेतला. तब्बल सहा तासांच्या ऑपरेशन नंतर आज ती स्त्री कॅन्सरवर मात करून जगत आहे, हे ऑपरेशन जरी सहा तासांचे असले तरी त्याच्या आधी दोन दिवसांपासून ते ऑपरेशन माझ्या डोक्यात सुरू होते. ती गाठ काढल्या नंतर पुढच्या सर्व शक्यता पेशंट ओटी मध्ये घेण्याआधीच पडताळून पहाव्या लागतात. ओटी मध्ये ऑपरेशन करत असताना ऑपरेशन सक्सेस झाल्यावर येणारी माझी स्माईल मला सर्वात जास्त आनंद देते कारण त्या एका स्माईलने एक जीव वाचलेला असतो आणि मी त्या स्माईलचा भुकेला आहे.” डॉक्टर सोबत झालेल्या तासभराच्या गप्पांत त्यांनी मला सांगितलेला हा अनुभव मला खूप भावला.

हि डॉक्टरची जाहिरात वगैरे नाही बरं, समाजात कॅन्सरचा विळखा वाढत चालला आहे अशात ज्याच्या घरात एखादा कॅन्सर रुग्ण असेल तोच या लेखाचे महत्व समजू शकतो. हा लेख वाचून जर एखाद्या गरजू रुग्णाला एका चांगल्या उच्च शिक्षित अनुभवी डॉक्टरबद्दल माहिती मिळाली आणि त्यातून एखाद्या पेशंटचा जीव वाचला तर माझ्या या शब्दांचे अमृत होईल म्हणूनच हा अट्टाहास केला. जो माणूस दर बुधवारी महिला, जेष्ठ नागरिक, पोलीस व आजी माजी सैनिकांच्या परिवारासाठी मोफत ओपीडी ठेवतो, बाहेरची करोडो रुपयांची आमिषे धुडकावून स्वतःच्या कर्मभूमीत मोठे हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न बघतो, माझ्या उंबऱ्यातून एकही पेशंट दुःखी गेला नाही पाहिजे असा विचार करतो. एक मित्र म्हणून अशा विचारसरणीचा मला अभिमान वाटतो.

प्रिय डॉक्टर राहुल, एकाच भेटीत तुम्ही मला आपलंसं केलं, प्रेम आणि आदर दिलात, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी तुमच्या रक्तात भिनली आहे त्याला तुमच्या मेंदूतल्या ज्ञानाची आणि हातांच्या अनुभवाची जोड मिळाली आहे. मोठ्या अभिमानाने सांगतो भविष्यकाळात तुम्ही जेष्ठ कॅन्सरतज्ञ दिवंगत नेने डॉक्टरांची पोकळी नक्की भरून काढाल हा विश्वास वाटतो. तुमच्या स्वप्नांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आता भेटत राहू पुन्हा पुन्हा. आणि हो दोस्तांनो, तुमच्याही आसपास जर एखादा कॅन्सर रुग्ण असेल तर मांजरे डॉक्टरांना नक्की भेटायला सांगा. धन्वंतरी भेटणे योगायोगाच्या गोष्टी असतात.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १६ ऑक्टोबर २०२०