योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर पडा, शट डाऊन आणि लॉक डाऊन सारख्या गोष्टी आपल्यासारख्या देशाला परवडणाऱ्या नाहीत. असे झालेच तर  हातावर पोट असलेली आणि सामान्य शेतकरी देशोधडीला लागतील. कोरोनाची लक्षणे दिसणार्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन देशभक्ती दाखवण्याची गरज आहे. या महिनाभरात परदेशातून भारतात आलेल्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे जास्त गरजेचे आहे. सर्वांना घरात कोंडून त्यांना घरबसल्या पोसण्याएवढी आपली अर्थव्यवस्था मजबूत नाही. एक दिवस काम नाही केले तरी उपासमार होणाऱ्यांची संख्या आपल्या देशात लाखात आहे. शेतातला माल विकला गेला पाहिजे. लोकांनी उत्तम आरोग्यासाठी ताज्या भाज्या, फळे, चिकन, मटण, अंडी, तूप, दूध खाल्लेच पाहिजे. हे सगळं खरेदी करण्यासाठी तोंडाला मास्क बांधून बाहेर पडलंच पाहिजे. कदाचित लॉक डाऊन सारखा निर्णय झालाच तर कोरोनापेक्षा टेन्शनमुळे आलेल्या हार्ट अटॅकनेच जास्त माणसे मरतील फक्त तसे मरणाऱ्यांची कोणी मोजदाद करणार नाही एवढंच.

शेतात माल पिकला आहे, लाखो रुपयांचा माल कणीस, ओंबी, शेंगा, घड, फळ स्वरूपात झाडावर लटकून आहे. व्यापारी कोरोनाची भिती घालून खूप कमी भावात शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत आहेत. शेतकरी देखील ह्या भावात तो विकत आहे. तोंडचा घास जाईल या भीतीने ते हवालदिल झालेत. डुप्लिकेट मास्क, डुप्लिकेट सॅनिटायझर बाजारात आलेत, ट्रॅव्हल कंपन्यांचा रेट दुप्पट तिप्पट झालाय, भविष्यात आणखीन काय काय होईल याची कल्पना करणेच कठीण आहे. परिस्थिती काहीही होवो पण माझ्या शेतकरी राजाच्या शेतातला माल विकत राहायला हवा. काय बंद करायचे ते करा पण मायबाप सरकार किरकोळ किराणा दुकाने, भाजीमार्केट, फळमार्केट आणि दूध डेअऱ्या सुरूच ठेवा कारण या शेतकरी अर्थव्यवस्थेच्या धमन्या आहेत. आज एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पाहिलेली चिंता वरील शब्दांना जन्म घालण्यास कारणीभूत ठरली. बाकी कोरोना झालेल्यांनी तो दुसऱ्याला होऊ नये म्हणून आणि न झालेल्यांनी तो आपल्याला होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली की सगळं सोप्पंय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १६ मार्च २०२०