गडावर डागडुजी करावी,
गडावर बाग फुलवावी,
गडांना जागतिक पर्यटनाचा दर्जा द्यावा,
गडावर मद्यपान करणाऱ्यांना शिक्षा करावी,
गडावर दिवाबत्तीची सोय करावी,
गडाची तटबंदी पुन्हा बांधावी,
गडावर थाटलेल्या चौपाट्या बंद कराव्यात,
गडावरील सहलींना अनुदान द्यावे,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
गडाचे पावित्र्य राखावे…

हे तर राहिलं बाजूलाच आणि निघालेत किल्ले भाड्याने द्यायला.

लक्षात ठेवा या गडकोट किल्ल्यांच्या कणाकणात पराक्रम मुरलेला आहे. तिथली माती जरी कपाळाला लावली तरी आमच्या नसानसांत पराक्रम भिनतो. याच गडकोट किल्ल्यांवर मोठ मोठी रिसाॅर्ट उभे करून एसीत बसुन माऊंटेन व्हिव्ह पहायचं स्वप्न पाहणाऱ्यांनो. जर असली फाल्तू स्वप्न पाहत असाल तर इथली शिवप्रेमी जनता तुमची स्वप्न उधळून लावेल. खबरदार ! वेळीच सावध व्हा. अस्मितांचा खेळ मांडू नका. एवढा मोठा महाराष्ट्रच आपल्याला आंदन दिलाय शिवरायांनी, हा कमी पडला की काय म्हणुन त्यांच्या किल्ल्यांवर नजर जावी का आपली. अरे तुमच्यासारख्या इतिहास न वाचलेल्यांसाठी ते डोंगर, दगड माती असतील पण इतिहास जगलेल्यांसाठी मात्र ते साडेतीन शक्तीपीठे आणि बारा ज्योतीर्लींगाएवढेच श्रेष्ठ आहेत. पुन्हा असला सडका विचार डोक्यात येण्याआधी मेंदुला जरा आवर घाला. अन्यथा मतदानरुपी हत्तीच्या पायी हा चिरडला जाईल.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०६ सप्टेंबर २०१९