नेहमीच्या वाटेवरून येताना डोंगर उतरत व्हतो. भिमा भऊंनी मोठ्यानं आवाज दिला “अय्य सरंऽऽ…आवं या हिर बघाया, गाळ काढायला चालू हाय” आवतानास मान दिऊन मी हिरीवर थांबलो. वाकून बघितल्यावर डोळं गरगरत्याल यवढी खोल व्हती हिर. गाळ काढल्यामुळं हिरीचं बुजल्यालं झरं मोकळं झालं व्हतं, त्यंचा खळखळणारा आवाज समद्या हिरीत घुमत व्हता सोबतच हिरीत उतरल्याली माणसं क्रेनमदी गाळ भरण्यात आणि मशनीवरची माणसं ती क्रेन वरखाली करण्यात गुतली व्हती. म्या आपलं भिमा भऊ आन् उत्राआप्पा बरूबर चार दुन हिकडल्या तिकडल्या गप्पाट्या मारल्या, पंधरा-ईस परसाखालच्या झऱ्याचं निवळसंग पाणी पिऊन गाडीला किक मारली आन् घरचा रस्ता धरला.

आजचा हा प्रसंग छोटाच पण घरी येईपर्यंत माझ्याबी मनातल्या नव्या झऱ्यातून एक विचार बाहेर पडला की; आपल्या मनातले चांगल्या विचारांचे झरे सुद्धा वाईट विचारांच्या गाळाने बुजुन गेलेले असतात. जसे विहिरीतलं पाणी वरून कितीही स्वच्छ दिसत असलं तरी त्याच्या बुडाशी मात्र गाळ असतोच, तसंच मनाच्या बुडाशी सुद्धा असा वाईट विचारांचा गाळ साचणे नैसर्गिकच असते परंतु आपणही कधीतर अशी गाळ काढणारी पुस्तकरूपी किंवा माणूसरूपी क्रेन आणून मनाच्या बुडाशी साचलेला वाईट विचारांचा गाळ काढायलाच हवा जेणे करून मनातल्या चांगल्या विचारांचे झरे पुन्हा सुरू होतील.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ जानेवारी २०१९