आज सहजच माझा लहानपणीचा दोस्त राहुल पवारच्या टपरीवर मी आणि विकास जाधव गप्पा मारत बसलेलो. विकास आमच्याहुन खुप लहान परंतु आमचं लहानपण श्रीराम पेठेतल्या जनावराच्या दवाखान्यातल्या कंपाऊंडमध्ये खेळण्यात कसे गेले याचे एकसे एक किस्से त्याला सांगता सांगता मी आणि राहुल सुद्धा लहाणपणात पुरते विरघळून गेलो. लहाणपणीचे खेळ खेळताना हाता पायावर झालेल्या दुखापतींचे व्रण पाहिले की प्रौढावस्थेतुन थेट बाल्यावस्थेत प्रवेश होतो. आजही तसेच झाले.

बालपणी ज्या मुलाच्या घरी काडीपेटीची पाकीटे, आंब्याच्या कुया, सिगारेटची रिकामी खोकडी, गोट्या, आट्टू, चिंचुके जास्त असायचे तोच श्रीमंत वाटायचा आणि वरिल सर्व गोष्टी म्हणजेच संपत्ती वाटायची. गोट्या वगैरे खेळताना जर हापळुंग झाला तर आख्खी प्राॅपर्टी हरल्याचा फिल यायचा आणि पाकीटांचा किंवा गोट्यांचा मोठा डाव जिंकला की लाॅटरी लागल्याचा आनंद व्हायचा. तेव्हाची बहुतांशी भांडणे “चिंडकी रंडी” आणि आंड घोळ” या शब्दावरून व्हायची. हे सगळे खेळ खेळताना कुणी चिडून खेळला तर त्याला चिडकी रंडी म्हणायचे आणि दगडी गोट्यांची जर कुणाला पेलन लागली तर ती कोपऱ्याने पेलता पेलता त्याच्या चड्डीला हात लावून आंड घोळ, आंड घोळ असं म्हणुन पळून जायचं. पेलन करताना हात सुटला की पुन्हा रिपीट व्हायची म्हणुन सहसा कुणी हात सोडत नसे. ज्याने जास्त आंड घोळ केलं त्याच्याशी मग नंतर शिव्याची लाखोळी वाहत भांडण करायचं.

घरी कुणी जवळचा पाहुणा माणुस आला तर सटी सहा महिण्यात एकदा मोठ्ठा रूपयाचा डाॅलर हातात पडायचा. त्याच रूपयाचे गोणेकरच्या हाॅटेलातून दोन पेढे घेऊन ते चाटुन चाटुन खायचे किंवा मोहन मामाच्या दुकानातुन चार पारले बिस्किटे घेऊन ती कडेकडेने कुरतडायची आणि मगच मधला पोर्शन संपवायचा. न्हाईतर मग सरळ आंबिकावाल्याकडुन छोटी सायकल तसाभर भाड्याने न्यायची हे ठरलेलं असायचं. कधी कधी आल्मासच्या दुकानातुन कुडमुड्याचे पुडे आणि पाव खाऊनही रूपया उडवायचोत. पाच रूपयाची लस्सी म्हणजे महिण्याभरातलं सर्वात मोठ्ठं फिस्ट असायचं.

सध्याच्या मोबाईल आणि कम्पुटर गेमच्या नादात आत्ताची लेकरं हे जुने खेळ विसरत चालल्याची खुप खंत वाटतेय. जगण्याच्या शाळेत अपमान, पराभव, आणि विजय पचवायला शिकवणारे हे जुने खेळ आणखीन काही वर्षांनी फक्त ब्लाॅगवर जिवंत राहतील. शाळेत खाटुर नंबर असुनबी विट्टी दांडू, कुया, गोट्या, लोंम्पाट, सुरपारंबा, चिरघोडी या खेळांचे सर्व नियम माहित असनारा तत्कालिन मित्र आम्हाला ऑलंपिकचा कोच वाटायचा. त्याच्याकडुन लहानपणी शिकलो म्हणुनच हे खेळ आजही ह्रदयात जिवंत ठेऊ शकलो. आता सगळे मार्कशिटवर अबाऊ नाईंन्टी येण्यासाठीच धडपडत आहेत. शहरी भागातुन नामशेष झालेले हे खेळ ग्रामिण भागातही आता अखेरचा श्वास घेत आहेत. सांगायचं एवढंच आहे की; लेकरं खेळायली तर खेळू द्या. अभ्यास करायला आयुष्य पडलंय, काही खेळ मात्र आयुष्यभर खेळता येत नसतात हे फक्त ध्यानात असु द्या.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ जून २०१८