शहरातील एका झोपडीवजा घरात राहणारा एक माणूस, घरात खाणारी सात तोंडं त्याच्या स्वतःसह बायको, म्हातारे आई वडील आणि दोन मुली व एक मुलगा. घरात कामावणारा हा एकटाच माणूस. रोज सकाळी एखाद्या भाकरीत मोकळी भाजी बांधून रोजगाराच्या शोधात चौकात उभा राहायचे. मिळेल त्या कामावर रोजंदारी करून दिवसाकाठी ३०० रुपये कमवायचे. मागच्या लॉकडाऊनमध्ये घरात होते ते सगळे संपले. आई वडिलांच्या औषधांच्या खर्चासह रोज किमान ५०० रुपये लागतात त्याला घर चालवायला पण सध्या वजाबाकीत सुरू आहे त्याचा संसार. कसे बसे दिवस काढून तो सोमवारपासून पुन्हा कुठेतरी काम करून तोंडाची आणि पोटाची भेट घालू इच्छित होता. दहा दिवसांच्या लॉक डाऊन आजच संपला होता म्हणून सकाळी लवकर उठून तो डब्बा घेऊन बाहेर पडला. तेवढ्यात शेजारच्या बंगल्यातील एका पोराने सोशल मिडियावर स्थानिक पत्रकारांनी टाकलेला प्रशासनाचा आजचा निर्णय वाचला आणि लगेच एका मित्राला कॉल करून बोलू लागला “काय यार, अजून पाच दिवस लॉकडाऊन वाढवला राव” सगळ्या वेबसिरिझ बघून झाल्या, साऊथचे आणि हॉलिवूडचे तीन चार डझन पिक्चर बघून झाले, रोज नवनवीन पदार्थ ट्राय करून पण आता कंटाळा आलाय बाबा, आता नवीन काय बघावे याचे टेन्शन आलंय राव. लंय बोरिंग जाणार यार अजून पाच दिवस” कामाच्या आशेने हातात डबा घेऊन चाललेला तो माणूस त्या पोराचे बोलणे ऐकून तसाच माघारी घरी जातो. लेकरं विचारत होती पप्पा माघारी का आलाव ? मोकळ्या सिलेंडरवर रचलेल्या सरपणातली दोन लाकडं चुलीत घालत बायकोने शेवटचे तांदूळ शिजायला टाकले. म्हातारे वडील पाकिटातली शेवटची गोळी थर थरत्या हाताने बाहेर काढत होते. हातातला डबा खाली ठेवून डेऱ्यातले घोटभर पाणी पिऊन तो उत्तरला “अजून पाच दिवस लॉकडाऊन वाढलाय” हे ऐकून पुढचे पाच दहा मिनिटे कुणीच कुणाला बोलले नाही. बायको डब्याकडे, लेकरं चुलीकडे आणि वडील गोळ्याच्या पाकिटाकडे एकटक बघत राहिले. त्या भयाण शांततेत शेजारच्या घरातील टीव्हीचा आवाज येत होता. “लॉकडाऊन मध्ये सेलिब्रिटी त्यांचा वेळ घरी कसा घालवत आहेत ते बघा.” खरंतर मला एक सुंदर शॉर्ट फिल्म तयार करता आली असती या गोष्टीवर पण मी काय दाखवतो यापेक्षा हा लेख वाचताना तुमच्या डोळ्यासमोर जे उभा राहते ते मला जास्त महत्वाचे वाटते म्हणून हे लिखाण तुमच्यासोबत शेअर केले.

लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ जुलै २०२०