पाहताक्षणी हा फोटो साधारण वाटत असेल पण यात जेवण करणारे गृहस्थ आहेत जगविख्यात चित्रकार दस्तुरखुद्द शशिकांत धोत्रे. काल व्याख्यानानिमित्त हिंगणीला जाताना शशीदादाची भेट घ्यायची म्हणुन त्यांच्या शिरापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. हा माणुस जगाची भ्रमंती करताना दसऱ्याची पुर्वसंध्येला निवांत भेटणे हा माझ्यासारख्या कलाप्रेमीसाठी सोनेरी क्षण ठरला. आमची चित्रकलेची जात एकच असल्याने भेटीचा प्रोटोकाॅल तोडत माझ्या आणि शशीदादाच्या जेवता जेवताच गप्पा रंगल्या.

माझ्या आजवरच्या सर्व बाॅलपेन पेंटींग आणि व्हिडीओ शशीदादाने कतुहलाने पाहिले. भारतीय चित्रकलेतल्या डोंगराजवळ माझ्यासारखा एक कण बसलेला असताना जणू तो डोंगर त्या मातीच्या एका कणावर कोसळावा आणि काही क्षणात त्याला त्या कणाला डोंगराएवढा आत्मविश्वास यावा असंच काहीसं वर्णन आमच्या भेटीचे करता येईल. एक लेखक म्हणुन उत्तम कांबळे सरांना भेटल्यावर जे वाटले तेच एक चित्रकार म्हणुन शशिकांत धोत्रे यांना भेटल्यावर वाटले. त्या त्या क्षेत्रातली एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यानंतर ही माणसं आपल्याशी कशी वागतात, काय बोलतात हे खरंच शिकण्यासारखं असतं.

पाऊन तासाच्या भेटीत शशीदादाने चित्रकलेचं आभाळच जणू माझ्यासमोर ठेवलं. माझ्यातलं चित्रकलेचं कसब पाहूण दादांनी अनेक नव्या गोष्टी मला सांगितल्या. “तू स्वयंप्रशिक्षित चित्रकार असलास तरी नवनवीन गोष्टी शिकून तू चित्रकलेतली उंची गाठू शकतोस” असा आत्मविश्वास जागविला. शशीदादा हा अतिशय शांत स्वभावाचा, ग्रामिण जिवनावर आणि त्याच्या कुटुंबावर निस्सिम प्रेम करणारा अद्वितीय चित्रकार आहे. वर्ल्ड क्लास आर्टीस्ट असतानाही आपली मुलं गावाकडच्याच शाळेत शिकवणारा, नेदरलँडला स्टुडीओ टाकुनही गावात अतिशय साधारण आयुष्य जगणारा हा माणूस एखाद्या पुस्तकापेक्षा नक्कीच कमी नाही.

त्याने रेखाटलेल्या चित्रातल्या साड्यांची आणि स्रीयांच्या चेहऱ्यावरील हावभावाची डिटेलींग पाहताना चित्रकलेची उंची समजून जाते. दगडी बांधकाम करण्यात पारंगत असलेल्या वडीलांच्या पोटी जन्माला आलेल्या शशिदादाने चित्रकला क्षेत्रात काळ्या कागदावर रंगीत पेन्सिलने बांधलेले रंगकाम भारतीय कलासृष्टीची उंची वाढवणारं ठरलंय. ही उंची अशिच आबाधित राहो. माझ्यासारख्या व्यक्तीला एवढा अमुल्य वेळ दिल्याबद्दल शशीदादाचे मनापासुन धन्यवाद !

माझ्या वर्ल्ड क्लास मित्रांच्या यादीत आज एका वर्ल्ड क्लास चित्रकाराची भर पडली. मैत्री माणसाला समृद्ध करते. इथं तर काही क्षणांत कलेचा समुद्र पाहता आला. इंद्रधनुष्य कायमस्वरूपी दिसत नाही पण जेव्हा दिसतो तेव्हा सगळं आभाळ रंगानी भरून टाकतो. तसंच शशिकांत धोत्रे सारखी माणसंही रोज रोज भेटणं अशक्यच परंतु इथुन पुढे जेव्हा केव्हा शशिकांत धोत्रे आणि त्यांच्या चित्रांबद्दलचा विषय निघेल तेव्हा, “अरे आम्ही एका ताटात जेवलो होतो” हे वाक्य मला अभिमानाने सांगायला आवडेल.

शिरापुरातील पोटभर आणि मनभर झालेल्या पाऊण तसाच्या भेटीनंतर नियोजित व्याख्यानासाठी हनुमंत सिरसट, बालाजी घाडगे, शुभम मिसाळ आणि आमच्या हनुमंतासोबत हिंगणीकडे प्रयान केले. प्रवास तर सुरूच असतो आपला पण जेव्हा रोजच्या प्रवासात असे मैलाचे दगड भेटतात तब ईत्तीसी जिंदगी भी बोहोत बडी लगने लगती है बाबू.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०८ ऑक्टोंबर २०१९