आत्ताच सरोज खान यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि डोळ्यासमोर त्यांच्या हजारो गाण्यांच्या छबी उमटायला लागल्या. चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरोज खान यांनी सुमारे दोन हजारहून जास्त गाण्यांची नृत्य बसवली. नव्वदच्या दशकातील सर्व गाजलेल्या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांचेच. माधुरी दिक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या राय ते दिपीका पादुकोण पर्यंतच्या जवळ जवळ सर्वच अभेनेत्रींना सरोजजीनी नृत्य शिकवले. आपल्याला फक्त पडद्यावर नाचणाऱ्या हिरोईन दिसायच्या पण त्यांना नृत्य शिकवणारी खरी हिरोईन आज आपल्यातून निघून गेली. सरोज दिदींनी भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अमूल्य आहे. जसे क्रिकेट म्हणले की सचिन, अभिनय म्हणले की अमिताभ, आणि संगीत म्हणले की लता तसंच नृत्य दिग्दर्शन म्हणलं की सरोज हे नाव अधोरेखित होत होते.

एक दो तीन (तेजाब), हवा हवा ई (मी.इंडिया), हमको आज कल है इंतजार (सैलाब), डोला रे डोला (देवदास), तम्मा तम्मा लोगे (थाणेदार), धक धक करने लगा (बेटा), चोली के पिछे (खलनायक), ये ईश्क हाये (जब वुई मेट), बरसो रे (गुरू), ताल से ताल मिला (ताल), राधा कैसे ने जले (लगान) मेरा पिया घर आया (याराना) ही सर्व गाणी आणि यातली नृत्य एक इतिहास आहे आणि तो घडवलेली नृत्य विरांगना म्हणजेच सरोज खान होय. कधी कधी पडद्यामागच्या काही कलाकारांची फक्त नावे घेतली की फारसे लक्ष्यात येत नाही पण त्यांच्या कलाकृती दाखवल्या की त्यांचे डोंगराएवढे कार्य समोर उभा राहते म्हणूनच वरील गाणी मी मुद्दाम इथे नमूद केली.

त्यांनी बसवलेली एक गाण्याची स्टेप भारतातील करोडो मुले मुली स्नेहसंमेलनात सादर करायचे, सहज सुंदर आणि सोपा पण तितकाच काळजाला भिडणारा नृत्य प्रकार सरोजजीनी उदयास आणला. अंगा पिंडाने जाड असतानाही नृत्य शिकवताना त्यांच्या शरीराची होणारी हालचाल गवताच्या पात्यासारखी असायची. सरोज दिदींची आणि माझी काही ओळख नव्हती पण त्यांच्या नृत्या सोबत नक्कीच होती. आज या रंगभूमीवरील त्यांची घुंगरे जरी शांत झाली असतील तरी त्या घुंगरातून निर्माण झालेला आवाज प्रत्येकाच्या कानात सदैव गुंजत राहील. सरोज दिदींना भावपुर्ण श्रद्धांजली.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३ जुलै २०२०