आज काॅलेजहून येताना उक्कडगांवच्या नदीजवळ तीन-चार पोरं चकारी खेळताना दिसली. गाडी तात्काळ थांबवून प्राध्यापकाला गाडीलाच अडकवून लहानपणीचा विशल्या बनून त्यांच्यातल्याच एकाची चकारी आणि दांडा घेऊन त्यांच्यासोबत शंभर मिटरची रेस खेळलो. सोबतचा फोटो मी ज्याची चकारी घेतली होती त्यानंच टिपलाय त्याबद्दल त्यास धन्यवाद ! ‘चकारी’ हा लहानपणीचा माझा आवडीचा खेळ होता. त्यावेळेस या एका टायरची किंमत आमच्या जिवाला मोठ्या गाडीईतकी होती. काय त्याची खातीरदारी असायची. जिवापाड जपायचो त्याला. खेळायचं झालं की खुंटीला टांगुण ठेवायचोत, कधी चुकुन गटारीत वगैरे गेले तर हापशावर निरमा लावून धुवायचोत.

टायरवर निब्बर लाकडाच्या दांड्याने एका लयबद्ध आवाजात ठोके टाकत टाकत सगळं गाव फिरायचो. मला माझा गांव या टायरनेच दाखवला. गावातली गल्लीना गल्ली आणि बोळना बोळ या चकारीमुळंच माहित झाली. तेव्हाचे खेळच असे असायचे की व्यायामाची गरज नव्हती पडत. “अयंऽऽ ईसल्या, तुला आईनं बुलीवलंय” जोपर्यंत असा निरोप येत नसे तोवर आमचं गावभर हुंदडनं चालूच असायचं. आज पबजीच्या झपाट्यात हे मैदानी खेळ लुप्त होत चालले. पोरं उंबरा ओलांडना गेली. हातातला मोबाईल सोडेना गेली. तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत लहानपणीचे खेळ विसरून चालली याची खंत वाटतेय.

ज्याच्याकडं सायकलची चकारी तो गरिब, ज्याच्याकडे एम.ए.टी, लुना, स्कूटरची चकारी तो मध्यमवर्गीय आणि ज्याच्याकडे हिरो होंडाची चकारी तो श्रीमंत हे असलं आमचं लहानपणीचं वर्गीकरण असायचं. आमच्या घरी हिरो होंडा असल्याने चकारीच्या खेळात मी श्रीमंत असायचो. सोबतीला पिशवीभरून गोट्या, चार बंडल पाकिटं, चिंचोके, पिंपळाच्या पिपाण्या, महानंदीच्या बंदुका, पाटीभरून कुया हाच माझा लहानपणीच्या बँकबॅलन्स होता.

दुचाकीचे किंवा सायकलचे वापरुन खराब झालेल्या टायरची किंमत ती काय हो. पण लहानपणी किती आनंद देऊन जायची. तसं पहायला गेलं तर ती एक टाकाऊ वस्तू पण या एका वस्तूत अख्खं बालपन टिकून राहिलं. सरकुलार मोशन आणि फोर्स काय असतं हे अकरावीत गेल्यावर फिजिक्स मध्ये शिकलो. ते शिकताना हिच चकारी आणि तीचा दांडा डोळ्यासमोरून हाटत नसे. खरंच नशिबवान आहे ती पिढी जी या ग्रामिण खेळातुन गेली.

राहुल्या, ईनुद्या, सच्या, शऱ्या, महाद्या, नऱ्या, आतुल्या, सुहाशा, काज्या, निल्या, बाल्या हे सगळे आमच्या लहानपणीच्या ‘चकारी’ क्लबची मेंबर मंडळी. आजही ही पोरं रोज दिसतात. सगळ्यांनी संसार थाटलेत. प्रत्येकजन जगरहाटीत काहीना काही काम करुन दोन घासांची सोय लावतोय. हि लंगोटीयार मंडळी कधीही दिसुद्या, भेटुद्या, माझ्या मनात लहाणपणीच्या आठवणी मोहोळाच्या माशांसारखी गर्दी करतात. खरंच दोस्तांनो तुमच्या लहानपणीच्या संगतीने माझं बालपन समृद्ध झालं. अन्यथा आज फक्त एका चकारीवर एवढं लिहायची औकात कुठुण आली असती ?

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०४ ऑक्टोंबर २०१९