जमिनीच्या तव्यावर सुर्याचा जाळ लागलाय. त्याचे चटके असह्य होत आहेत. एखाद्याचा राग आला की आपण डोळे वटारून त्याच्याकडे बघतो. हा सुर्य सुद्धा असाच वटारून बघायलाय. त्याची झाडे तोडलीत, नद्या नासवल्यात, हवा प्रदुषित केली, हिरव्या गार जमिनीवर सिमेंटचा थर हातरलाय. माणसाच्या एवढ्या उपद्व्यापानंतर त्या सुर्यनारायणाला येणारा राग समजून घ्यायला हवा.

माणसाने त्याच्या खुपसाऱ्या गोष्टी ऐशोआरामात जगण्यासाठी निसर्गाची काळजी न घेता बदलल्या आहेत. पण निसर्ग मात्र पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा आणि मग उन्हाळ्यानंतर पावसाळा याच क्रमाने जगतोय. आपल्या बदलण्यामुळे निसर्गसुद्धा स्वतःला बदलू पाहत आहे. तंत्रज्ञानाच्या शिडीवरून जरी आपण वर जात असु तरी ती शिडी लावायला जमिन मात्र निसर्गाचीच आहे हे विसरत चाललोय. मातीच्या आणि झाडांच्या आपापसातील नात्याला आपण तोडून टाकत आहोत. या दोन्हीतला दुवा असणाऱ्या पाण्यालातर आपण केव्हाच उपसुन टाकलंय. मी देव पाहिला नाही पण तो झाडांच्या पाना पानात असतो हे खरं वाटतंय.

कुणी आपलं घर पाडलं तर त्याचा आपल्याला किती राग येईल पण इथे एक झाड तोडले तर कितीतरी किटक, पक्षी, प्राणी एका क्षणात बेघर होतात. निसर्गाने त्यांच्यासाठी बांधलेली ही घरे आपण आपल्या ईमारती बांधण्यासाठी तोडून टाकत आहोत. याचा राग निसर्गालाही येतच असेल की पण आपण फक्त ‘ऊन जरा जास्त आहे’ असे म्हणुन सोडून देतो. अरे एकदा डोळे वर करून बघा त्या तळपत्या सुर्याकडे तो डोळे वटारून सज्जड दम भरतोय आपल्याला आणि म्हणतोय. “अरे झाडे लावता येत नसतील तर नका लावू फक्त उगवलेली तरी तोडू नका. मातीतुन एक कोंब उगवला की त्याचे आणि माझे एक नाते तयार होते. मी त्यांना पोटच्या लेकरांसारखा वाढवतोय पण तुम्ही मात्र आमची नाळ तोडताय. मला तुमचा राग येतोय”

ऊन जास्त लागतंय याचा अर्थ सुर्य पृथ्वीच्या जरा जास्तच जवळ आलाय असा होत नाही. पृथ्वी आणि सुर्याचे उन्हाळयात असणारे आपापसातील अंतर अनादीकाळापासुन तेवढंच आहे. झाडाचे आणि आपले अंतर मात्र आपण वाढवले असल्याने त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगायचे आहेत. आता तर फक्त घाम निघायलाय भविष्यात त्वच्या जळण्याइतपत सुर्य आग ओकेल तेव्हा सुर्याचा राग शांत करायचा असेल तर घरात फॅन, कुलर, एसी लावण्यापेक्षा एक झाड लावा आणि स्वतःपुरती सावली स्वतःच तयार करा.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०२ मे २०१९