आज लय दिसातून  काॅलेजहून उक्कडगांवपस्तोर चालत आलो. म्हागटलं चार दोन पौस  निब्बार झाल्यामुळं नद्या उगं खळखळा वाह्य लागल्यात्या. काल माझी फोर्डची सर्व्हिशींग करायला लातूरला गेल्तो. गाडीला रानडुक्कराची धडक झाल्यामुळं ते येशीचा चेंबर का काय म्हणत्यात ते फुटला व्हता. लाॅकडाऊनमुळं शोरूममदीबी ते पार्ट नव्हतं; मंग काय पुन्ह्यांदा हेल्पाटा मारन्यापेक्षा जवा येत्याल तवा बसवा म्हणून मी बाहीर पडलो पण गावाकडं ययची पंचायत झाली. मग प्रा.उतके सरांकडं मुक्काम करून आज सकाळी आमचं संस्थाध्यक्ष सोनवणे सरांच्या इंपोर्टेड  स्कोडा गाडीत उक्कडगांवच्या काॅलेजपर्यंत आलो. आता काॅलेजपसुन घरापर्यंतचं आंतर आठ एक किलुमिटर हाय तवा म्हणलं कुठं कणाला बुलवीत बसा जाऊ चालत बीगी बीगी. पाटील सर सोडायला येतो म्हणत व्हतं पण त्यंलाबी म्हणलं जातो चलत. तसंबी रोज चार किलोमिटर चलायची सवय हायचं म्हणा. सर लैच अट्टाहास  करायलं म्हणुनशान मग माझा भाऊ रूपेशला फोन केला आन् म्हणलं “ये उक्कडगांवपस्तोर, तवर मी येतो तिथपर्यंत चालत. आल्यावर नदीच्या पल्याडंच थांब.”

माझ्या घरापसुन ती काॅलेजपर्यंतचा रस्ता म्हंजी निसर्गानं ऊगं लय मन लावून तयार केलेली एक भारी कलाकृतीच जणू. आख्खं ‘रिंदगुड’ हे पुस्तक ह्या रोडवरून गाडीवर जाता येता दिसलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींवर लिव्हलंय म्या. ह्यज्या आदीबी म्या लैंदा आस्लं आनुभव लिव्हल्यातं पण आज चालत येताना निसर्गाच्या कुशीत फिरता फिरता डोळ्याचं पारणं फिटावं एवढं भारी वाटलं. गर्द हिरव्या झाडीतुन सावलीच्या आंधारात झाकल्याल्या पाऊल वाटंवरून चलताना पक्षी, प्राणी, किटक बघत बघतच पावलं टाकत व्हतो. हातात एक पिशवी व्हती पण पुस्तकाच्या वझ्यानं तेचाबी मदीच बंद तुटला. मंग काय हातातच पस्तकं घिऊन माझी आपली पायपीट चालू झाली. रस्त्यानं येणारं जाणारं वळकीचं समदं शेतकरी लय आपुलकीनं ईचारायचं “आवं सर, आज चलत का गाडी कुठं हाय ? यिऊ का सोडायला न्हायतर ह्योका घिऊन जावा ही गाडी”. “न्हाय ! मुद्दामंच चाललोय चालत, घरून बुलीवलंय भावाला यिलच ह्येवढ्यात.”

गावाजवळच्या नदीवर आल्यावर मातर म्या पॅन्ट वर सारली, चप्पला एका हातात आन् पुस्तकं दुसऱ्या  हातात घिऊन शेवाळल्याल्या दगडावर दबकत दबकत पाय ठिवत खळखळा वाहणाऱ्या पाण्यातुन चालू लागलो. खरंच आस्ला आनुभंव शेवटचा कधी घेतला हे आठवत सुदा नव्हतं. लहानपणी ही कसरंत रोजची वाटायची पण आता गाड्या घोड्यामुळं ही आसली जिंदगी जगायलाच मिळत नाही. समदी आपली त्या येळंसोबत शिवनापाणी खेळत्याती आन् त्येज्याच नादात निसर्गाच्या हातात हात घालून जगण्याला मुकत्याती. म्या मातर हे आस्लं जिनं सारखं जगण्याचा प्रयत्न करत आस्तोय. मनाला निसर्गाच्या सानिध्यात राहायचा चटका लावला की ते आपोआप आसल्या गोष्टी आपल्याकडुन करून घेतंय.

जगातली सगळी सुखं निसर्खानं आपल्याउशाला ठिवल्याती पण साला आपुन सुख कशात हुडकतांव हिच समजत नाही. अनवानी पायानं वाहत्या वड्यात चालताना त्या गुळगीळीत दगडांचा तळपायाला झाल्याला स्पर्श पार मेंदुला ताजातवाना करत व्हता. खरंतर चालतानाच आज काहीतरी ल्ह्ययचंय हे ठरीवलं व्हतं पण सोबत फुटूबी तेवढाच जिवंत पायजे व्हता मग काय नदीच्या पल्याड यीऊन थांबलेल्या रूपड्याला ह्यो फुटी टिपाया लावला त्यंनंबी नेमका टिपला म्हणुनंच माझं लिखाण ह्या फुटूला डिक्टो मॅच झालं. पुढं गाडीवर बसायच्या आधी जवळंच आसल्याल्या कोरड्या दगडांवर बसुन दुनी पाय पाण्यात सुडुन, डोळे मिटुन वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज ऐकत तल्लीन झालो. दिवसभरातला सगळा तान तनाव वाहूण गेला. मन स्वच्छ आणि शद्ध झालं त्याच वाहत्या पाण्यासारखं. अंतरंग तर धुतलंच व्हतं, घरी आल्यावर हात पाय तोंड धुवून बाह्यअंग पण धुतलं. चहाचा फुरका घेत घेत आजचा हा अनुभव टायपीत बसलो. सरतेशेवटी निसर्गासाठी जशा किड्या, मुंग्या, पशु, पक्षी तसाच माणुससुद्धा तेव्हा आपण लावलेले सगळे शोध एकदा खुटीला टांगुण त्या मातीला पायाचा स्पर्श करून बघा लय जब्राट ताकद हाय यात.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १ जुलै २०२०