आज संध्याकाळी ०९:२७ ला ‘जगदंब’ हा अखेरचा शब्द उच्चारून महाराजांचा हात कवड्याच्या माळेवरून खाली उतरला आणि खरंच क्षणभर श्वास थांबला, मुठी आवळल्या गेल्या, ह्रदयाची धडधड वाढली. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच दृकश्राव्य माध्यमातून महाराजांचा शेवटचा श्वास पाहिला. एव्हाना रडायचं म्हणलं तरी रडू येत नाही पण आजचा भाग पाहताना डोळ्यातील अश्रू आपसुकच गालावर ओघळले आणि त्या अश्रूंनी जणू शिवरायांवर असणाऱ्या असिम प्रेमाची साक्षच दिली. महाराज आज आपल्यामध्ये नाहीत परंतु साडेतिनशे वर्षानंतरही त्यांचा परिणाम आपल्या नसानसांत भिनल्याची जाणिव या प्रसंगातुन अधोरेखित झाली.

ईतिहासातील अतिशय दुःखद घटना परंतु ते दाखवण्याचे धाडस या मालिकेने केले. या घटनेबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. खरं काय ते फक्त रायगडालाच ठाऊक. शंभूराजांचा राज्याभिषेक व त्यानंतरचा त्यांचा लढवय्या कालखंड आपल्यासमोर मांडायचा असेल तर आजचा क्षण दाखवणे भागच होते. म्हणुनच आजवर अनेक नाटके, मालिका व चित्रपटात टाळलेला शिवरायांच्या मृत्यूचा प्रसंग स्वराज्य रक्षक या मालिकेने दाखवण्याचे धाडस केले. शंतनू मोघे या कलाकाराने महाराजांची व्यक्तिरेखा अतिशय उत्तम साकारली आहे. शंतनू सर या मालिकेतला आपला अभिनय संपला असेल कदाचित परंतु तुम्ही साकारलेली शिवरायांची छबी ही रयत कधीही पुसणार नाही. जगदंब ! जगदंब !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २२ नोव्हेंबर २०१८