संसाराच्या महाराणीला घेऊन कधीतरी उंच पाळण्यात बसवुन फिरावावं. गावातल्या छोट्याशा दुकानांऐवजी दुकानांच्या रांगाची रांगा पाहाव्यात. हजारो लाखोंच्या गर्दीत आपल्या माणसाच्या हाताला धरून गर्दीच्या घोळक्यात वाट काढत चालावं. एखाद्या गाड्यावर उभा राहुन भेळ आणि पाणीपुरीचा आस्वाद घ्यावा. गावकुसातील कलाकारांची कलाकुसर पाहावी. मीठ शिंपडलेल्या कलिंगडाच्या फोडी खात खात राहुट्या टाकून उभारलेल्या दुकानांची तासंतास विंडो शाॅपिंग करावी. कुडकुड्यावर दहा पाच रूपये उडवावे, वीस रूपये गुंडाळलेल्या साबणावर रिंगा टाकाव्या. मौत का कुआ पासुन सर्कशीपर्यंतचे सगळे खेळ बघावे. हरएक मालच्या वस्तू खरेदी कराव्या. असा हा जिवंत माणसांचा मेळा अनुभवण्यासाठी एकदा बायकोला घेऊन जत्रेला जायलाच हवं कारण बायको खुश तर संसार खुश नायतर धुसपुस. शहरातल्या माॅलमध्ये अशा स्टॅण्डर्ड जत्रा रोजच भरत असतात पण काळ्या मातीतल्या आमराईत भरणाऱ्या आमच्या येडाईच्या जत्रेची बातच काही और आहे. बोला आई राजा उदो उदो !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ एप्रिल २०१९