जर मी यावर व्यक्त नाही झालो तर मी माझ्यातल्याच लेखकावर अन्याय केला असे होईल. काही सिनेमे असतातच असे की अवघ्या दोन अडीच तासात ते तुमच्या मेंदूतल्या विचारांना इतके घुसळतात की शब्दांचे लोणी वरती तरंगून आल्याशिवाय राहत नाही. ते घुसळण होण्यासाठी ‘जय भीम’ हा तामिळ चित्रपट नक्की पाहायलाच पाहिजे. तसं तर सर्वांनीच पाहावा पण पोलीस आणि वकिलांनी तो आवर्जून पाहावा. हा सिनेमा पाहताना जर तुम्हाला एकदाही गहिवरून आलं तर समजून जा तुमच्यातली माणुसकी अजूनही जिवंत आहे.

हा चित्रपट पाहिला की आपल्या राज्यघटनेवरचा अभिमान दुप्पटी तिपटीने वाढतो. व्यवस्थेतल्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी यात दाखवल्या आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे वाक्य हा सिनेमा जगतो. काही जाती किंवा त्या जातीतल्या काही व्यक्तींमुळे जरी तुमच्या मनात जय भीम या शब्दाबद्दलची भूमिका वेगळी ठसली असेल तरी हा चित्रपट पाहिल्यानंतर मात्र ती बदलण्यास नक्की मदत होईल.

चित्रपटाची स्टोरी लाईन लिहिणे मी मुद्दाम टाळतो. तसे केल्याने तुमची चित्रपट बघण्यातली मजा निघून जाईल. काही चित्रपटांना प्रमोशनचीच गरज नसते कारण त्यांच्या स्टोरी मधेच एवढा दम असतो की जो तो चित्रपट पाहतो तो दुसऱ्याच क्षणी त्याचा प्रमोटर होऊन जातो. लोकांच्या तोंडातून प्रसिद्धी मिळवलेला कोणताही चित्रपट यशाच्या सर्वोच्च शिखरावर आपोआप विराजमान होतो था.से.ज्ञानवेल लिखित आणि दिग्दर्शित ‘जय भीम’ त्यापैकीच एक.

विशाल गरड
१० नोव्हेंबर २०२१