आज काॅलेजहून येता येता वडगांव पाटीजवळ एका शेतात असलेल्या रसवंती गृहावर रस पिण्यासाठी थांबलो होतो. अचानक माझे लक्ष तेथे बाजूलाच असलेल्या जांभळाच्या झाडाकडे गेले. टपोऱ्या राही जांभळांनी लखडलेलं ते झाड पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले. त्या झाडाखाली एक आजीबाई हातात काठी घेऊन बाजंवर बसल्या होत्या. मला वाटलं राखणीसाठी असतील, त्यांच्याजवळ एक इसम गप्पा मारत बसलेला. शेजारीच एका टेबलावर ती जांभळं विकणारा व्यापारी होता. मी थेट व्यापाऱ्याकडे गेलो आणि त्याला म्हणालो “की हे घ्या वीस रूपये, मला फक्त पाच सहा जांभळं झाडावरची तोडून खायची आहेत. मी त्या व्यापाऱ्याच्या हातात पैसे ठेवतच होतो तोच त्या आजीबाईजवळ गप्पा मारत बसलेले इसम माझ्याकडे आले आणि मी दिलेले पैसे परत करत मला एका झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले ” हे बघा या झाडावरची लागल तेवढी जांभळं खावा ह्या झाडांचा मीच मालक आहे बाकी सगळी झाडं व्यापाऱ्याला विकली आहेत; एवढं एकच घरी खायला ठेवलंय”, “झाडावरची ताजी जाभळं खायची माझी तीव्र ईच्छा बघुन त्या शेतकऱ्याने एका शिडीचीही सोय केली. त्या शिडीवर चढून झाडाला लागलेली काळीभोर जांभळं तोडून खाऊन तृप्त झालो.

असा गावरान रानमेवा थेट रानात जाऊन खाऊ दिल्याबद्दल त्या शेतकऱ्याचे आभार मानत मी माझे व्हिजीटींग कार्ड त्यांच्या हातात टेकवले. व सहज विचारपूस म्हणुन त्यांना त्यांचे नाव विचारले तेव्हा समजले की ज्या ईसमास मी एक शेतकरी समजत होतो ते बालभारतीमध्ये जाॅईंट डायरेक्टर म्हणून काम पाहणारे नवले साहेब आहेत. शेतीची आवड असल्याने ते सुट्टीदिवशी शेताकडे येतात. आजवर शेतकऱ्याचं पोरगं साहेब झालेलं बघीतलं होतं आज मात्र एक शेतकरी असलेला साहेब बघायला मिळाला.

(तळटीप : सोबतचा फोटो आमच्या महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक अरूण अडगळे सरांनी नकळत टिपला आहे.)

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ जून २०१८