‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाची विजेता, सुवर्ण कट्यारीची मानकरी, महाराष्ट्राची महागायिक सन्मिता धापटे-शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. घरातल्या माणसांनी जरा उशिरा अभिनंदन केले तरी चालते म्हणून उशिरा का होईना पण प्रत्यक्ष भेटून माझे जिवलग मित्र सुप्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांच्या स्वर सरस्वतीचे कौतुक केले. संबंध महाराष्ट्राच्या आणि जगभरातील तमाम मराठी संगीत रसिकांच्या घराघरात सन्मिताचा आवाज पोहोचलाय. तिने तिच्या स्वरांनी आपल्या मनावर जो सडा टाकला आज त्या सड्यावर छान कौतुकाची रांगोळी काढली.

मी घरात गेल्या गेल्या गणेशरावला म्हणालो घरात दोन दोन सेलिब्रिटी झाले आता; पण खरं सांगू प्रसिद्धीला उंबऱ्याच्या बाहेर ठेवून घरात आलेल्या मित्रांशी अतिशय आपुलकीने बोलणारी, आदरातिथ्य करणारी गणेश आणि सन्मिता म्हणजे विण्याच्या तारेची दोन टोके आहेत. त्यांच्या संसाराची तार त्यांनी त्या दोन्ही टोकांना इतकी छान बांधली आहे की त्या तारेला सहज जरी छेडले तरी स्वरांचं शिंपडन पडतं. तासाभराच्या भेटीत मलाही त्या तारा छेडता आल्याचे समाधान लाभले. चहाचे फुरके मारत मारत खूप साऱ्या गप्पा झाल्या अनुभव आणि किस्से शेअर केले.

टिव्हीवर जेव्हा जेव्हा सन्मिता गायची तेव्हा आम्ही सहकुटुंब ते ऐकायचो, आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा टीव्हीवर येते तेव्हा वाटणारी आपुलकी आणि उत्सुकता अमच्यातही होतीच. मी संगीताचे फारसे कार्यक्रम पाहत नाही पण सन्मिताच्या स्वरांनी ते पाहण्यास भाग पाडले. ती भविष्यातली एक यशस्वी गायिका आहे जिच्यात या क्षेत्रात अढळ स्थान निर्माण करण्याची क्षमता आहे. गळा सर्वानाच असतो पण त्याला दिलेल्या रियाजातून स्वरात माधुर्य आणण्याची क्षमता काहींमध्येच असते जी सन्मिताने सुवर्ण कट्यार मिळवून सिद्ध करून दाखवली.

महाराष्ट्राच्या स्वरांनी देशावर अधिराज्य गाजवले आहे हा आपला इतिहास आहे तीच परंपरा सन्मिता पुढे चालवेल हे फक्त ती एका शो ची विजेता ठरली म्हणून नाही सांगत तर, तिचा तिच्या स्वरांवर आणि आपल्याला तिच्या गायनावर असलेल्या विश्वासामुळे सांगतोय. बाकी ‘वाहिणीसाहेब, अभी तो सिर्फ मुखडा गाया है आपने और तो पुरा गाना बाकी है.’ तुमच्या नवीन अल्बमची नेहमीच प्रतीक्षा असेल. आणि हो गणेशराव, ज्या पद्धतीने तुम्ही बायकोच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात तिला तिची स्वप्नपूर्ती करून देण्यासाठी त्याला तोड नाही. सन्मिताला जरी कट्यार मिळाली असेल तरी या कामासाठी मात्र तुम्हाला तर तलवारच द्यायला पाहिजे. तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम आणि तुमच्या दोन दिर्घ स्वरातुन जन्मलेल्या मनू नावाच्या ह्रस्व स्वराला गोड गोड पापा.

विशाल गरड
दिनांक : २८ ऑगस्ट २०२१