ही टिकल्यांची माळ फरशीवर ठेवून एक दगड हातात घ्यायचा मग त्या दगडाचा टोकदार भाग नेम धरून टिकलीच्या गुलावर आदळायचा, कधी पहिल्या प्रयत्नात तर कधी दुसऱ्या प्रयत्नात फाटकन फुटायची. त्यात जर सुट्ट्या टिकल्या मिळाल्या तर मग एक एक टिकली उडवायला अजून मज्जा यायची. कित्येकांची लहानपणी पोलिस बनण्याची ठिणगी याच टिकलीच्या आवाजातून पडली आहे. प्लास्टिक किंवा लोखंडी बंदूक नसायची म्हणून बराच उपद्व्याप करावा लागायचा आम्हाला, महानंदीच्या लाकडाला सायकलची तार आणि रबर लावून बंदुक बनवण्यात आमची मास्टरी झाली होती. आजही त्या बंदुकीची खूप आठवण येते.

फटाक्याच्या दुकानात तासंतास न्ह्याहळत उभारणे भारी वाटायचं. त्या दुकानातला तो फटाकड्यांचा वास फराळाच्या सुगंधापेक्षा हवाहवासा वाटायचा. खूप वेळ उभारल्यावर दुकानदार एखादा एटमबॉम्ब उडवायला द्यायचा त्यामुळे एक विझवलेली उदबत्ती आणि काडीपेटी खिशातच ठेवायचो. दिवाळी आधी सलग दोन तीन दिवस रुसून, फुगून आणि रडून झाल्यावर वडिलांनी आणलेली लोखंडी बंदूक मी कितीतरी वर्षे जपून ठेवली होती. पुढे चोर पोलीस खेळताना तीच वापरायचो. दर दिवाळीला या जुन्या आठवणी ताज्या करणं हे सुद्धा दिवाळी साजरी करण्यासारखंच आहे.

आताच्या पिढीला बापाकडे मागूस्तोवर बंदूक मिळते, काहींना तर न मागताच; त्यामुळे ती बनवण्याची खटाटोप करण्याचा विषयच येत नाही. ती क्रिएटिव्हिटी निर्माण करण्याला वाव मिळत नाही. दिवाळीला आणलेल्या फटाक्यांपैकी तुळशीच्या लग्नासाठी त्यातल्या किती शिल्लक ठेवायच्या याचे देखील नियोजन असायचे कारण ते मोजकेच असायचे; आता फटाके असेच शिल्लक राहतात. अभ्यंगस्नान वगैरे काही माहीत नव्हते आंघोळ झाल्यावर नवीन कपडे घालायचे, खुंटीला अडकवलेली फटाक्यांची पिशवी काढायची, आणि उदबत्ती पेटवायला चुलीसमोर जायचे हीच दिवाळी होती. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.  हॅप्पी दिवाली.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १४ नोव्हेंबर २०२० (बालदिन विशेष)