आज टिक टॉक बंद झाले. माझे तर टिक टॉकवर अकाउंटच नव्हते पण कधी तरी विरंगुळा म्हणून मीही ते व्हिडिओ पाहायचो. तळागाळातील अनेक कलाकारांना टिक टॉक मुळे व्यासपीठ मिळाले ज्यांची कोणी दखल घेत नव्हते ती लोकं याच माध्यमातून स्टार झाली. तुमच्या रूपाने नाही तर तुमच्या मध्ये असलेल्या वेगळेपणामुळे जग तुम्हाला ओळखू शकते हे टिक टॉकमुळे शक्य झाले. भारतात जेवढे काही या अॅपचे युजर्स होते त्यापैकी कित्येकांना तर माहीत सुद्धा नसेल की हे अॅप चायनीज होते म्हणून. एकाचं बगून एक ही अशी शृंखला वाढत गेली आणि हे अॅप पॉप्युलर होत गेले. स्वदेशी मुद्द्यावर ते आज बंद झाले हे एका दृष्टीने चांगलेच झाले. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तशा टिक टॉकलाही होत्याच फक्त त्याचा वापर कोण कसा आणि कशासाठी करतो यावर त्या अवलंबून होत्या.

स्वतःमधील वेगळेपणा दाखवण्यासाठी सहज आणि सोपी प्रणाली टिक टॉक मध्ये होती. जन्माला आलेल्या प्रत्येकाला वाटत असते आपण सुंदर दिसावे या अॅप मध्ये असे काही फिल्टर होते की सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा सेलिब्रिटी लुक यायचा. व्हिडिओला संगीत द्यायचे हा तर काही सेकंदाचाच खेळ होता म्हणूनच जास्तीत जास्त लोकं ती वापरायला लागली. टिक टॉक पाहून पाहून त्या माध्यमातून अनेक नवनवीन कल्पना मिळायच्या. टिकटॉक पाहणे निवळच रिकामटेकडेपणाचे काम होते असे नाही तर त्यावर कमी वेळात आपल्याला हवी असलेली अनेक विषयांची माहिती सहज उपलब्ध व्हायची. अनेक क्षेत्राबद्दल छोटे छोटे व्हिडिओ खूप ज्ञान देऊन जायचे. गावगाड्यातील कलाकारांमधील सुप्त गुण या माध्यमातून बाहेर आले. कित्येक जण स्टार झाले. काहींना तर यातून रोजगार सुद्धा उपलब्ध झाला.

अवघ्या पंधरा सेकंदात उपयुक्त माहिती टिक टॉक व्हिडिओ मध्ये आपल्याला मिळायची. त्यातही काही एकदम फालतू रिकामटेकडे व्हिडिओ असायचे नाही असे नाही पण आपल्याला जे आवडते ते आपण पाहू शकत होतो. ज्ञान, आरोग्य, आहार, शेती, मनोरंजन, सौंदर्य, पाककला, चित्रकला, देशीजुगाड, संगीत अशा अनेक विषयांवरील व्हिडिओ अर्थपूर्ण असायचे. टिक टॉकने युवा वर्गातली सृजनशीलता बाहेर आणली. अल्पावधीतच ती गरिबांची एक इंडस्ट्री म्हणून उभा राहिली. टिक टॉकच्या क्रेझ पासून सेलेब्रिटी सुद्धा वंचित राहिले नाहीत त्यांनीदेखील या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले. एवढेच काय, युवा वर्गाचा यावरील राबता पाहता सी.एम.ओ ऑफीसला सुद्धा यावर अकाउंट काढावे लागले.

माणूस मेला की वैर संपते असे म्हणतात तसेच टिक टॉक सुद्धा आज वारले. जग सोडून जाणारा जसा आठवणी मागे सोडून जातो तशाच आठवणी या टिक टॉकने सुद्धा सोडल्यात. वैयक्तिक मनोरंजनाच्या दुनियेत या अॅपने सामान्य भारतीयांना जी ओळख निर्माण करून दिली ती नाकारता येणार नाही. तसेच यामाध्यमातून निर्माण होणारा पैसा जर आपल्याच देशाच्या विरोधात वापरला जाणार असेल तर त्याचेही समर्थन कदापी शक्य नाही. या अॅपवरचे अनेक व्हिडिओ पाहून मी हसलो आहे पोटभर पण गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांच्या लेकरांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याच पोटात गोळाही आला होता. एक अॅप अनइन्स्टॉल करून दुसरे डाउनलोड करताही येईल हो कदाचित पण आयुष्यातून गेलेला बाप पुन्हा परत मिळवता येत नाही. अलविदा टिकटॉक, जय हिंद.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० जून २०२०