माझे धाकटे बंधू युवराज यांनी छोटंसं पिल्लू असताना याला घरी घेऊन आलता, तेव्हापासुन युवराज आणि त्याच्या आईने (आन्टी) जणू हे त्यांचं दुसरं लेकरूच आहे असा सांभाळ केला. प्रचंड लळा लागला होता सर्वांनाच त्याचा. डाॅबीची चमकणारी स्वच्छ तांबडी कोमल त्वचा हात फिरवताना मऊ रेशमाच्या वस्त्रावर हात फिरवल्याचा फिल द्यायची. त्याचा खणखणीत आवाज सगळ्या गल्लीला जागं करायचा. शेपटी कापलेली होती तरी तीचा इवलाशा गोंडा जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवताना हलवत रहायचा. असा आमचा डाॅबी काही दिवसापुर्वी आजारी पडला. उपचार व्यवस्थित हुरू होते. इंजेक्शन, सलाईन, औषधोपचार सुरळीत सुरू होता. पर्वा काॅलेजच्या कामानिमित्त मी दोन दिवस घरी येऊ शकलो नव्हतो.

आज घरी आलो गोठ्यात गेलो डाॅबीचं सुटलेलं दावं पाहिलं पण डाॅबी नव्हता; मी ईकडे तिकडे पाहिलं डाॅबी दिसला नाही मग मला वाटले कदाचित आमच्या आण्णांनी त्याला गाडीत घालून फिरवण्यासाठी शेतात घेऊन गेले असावे. हा विचार डोक्यात सुरू असतानाच घराबाहेर गाडीचा आवाज आला तोच मी पळत दरवाजाजवळ गेलो. अंधारात जास्त दिसत नव्हते. पहिल्यांदा युवराज गाडीतुन उतरला आणि लागलीच तो गाडीचा मागचा दरवाजा उघडू लागला. मला वाटले की आता दरवाजा उघडताच डाॅबी उडी घेऊन बाहेर येईल. युवराजने दरवाजा उघडला आत हात घातला आणि गाडीतुन ‘टिकाव’ बाहेर काढला. त्याच्या हातातला टिकाव पाहूण काळजात धस्स झालं. तेवढ्यात पिंकी पळत आली आणि म्हणाली “भैया, आपला डाॅबी आपल्याला सोडून गेला”. शप्पथ घरातलंच कुणी साडून गेल्याची भावना क्षणभर मनात तरळली. हुंदगे दिऊ दिऊ रडू वाटायलं पण स्वतःला आवरलं. विरा माहेरी होती तिलाही ही बातमी फोन करून सांगितली दोघंही फोनवर दुःखी स्वरात बोलू लागलो. डाॅबीच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो.

आमच्या आन्टीने आणि युवराजने डाॅबीला लेकरासमान जीव लावला होता आज त्याच्या जाण्याने त्यांना अतिव दुःख झालंय. त्यांचे सांत्वन निदान आज तरी कोणत्याच शब्दात होऊ शकत नाही. डाॅबीच्या जाण्याने फक्त आमचे कुटुंबियच नाही तर सगळे नातेवाईकही हळहळले आहेत. खरंच ते एक कुत्रं होतं पण त्याच्या प्रामाणिकपणाने आमच्या घरात एका माणसाची जागा बनवली होती. ती आज रिकामी झाली. त्याला बांधत असलेले काळं दावं आणि दुध भाकरीचा काला ठेवत असलेले ते भांडे पाहुण पुन्हा पुन्हा डोळयातुन अश्रू वाहत आहेत. डाॅबी तू आम्हाला सोडून गेलास, आजवर तू घराची केलेली राखन आणि तुझा तो आवाज सदैव स्मरनात राहिल. तुला भावपुर्ण श्रद्धांजली !

शोकाकुल : प्रा.विशाल गरड आणि कुटुंबिय
दिनांक : १५ जुलै २०१९