आज आमच्या एका पाहुण्याच्या लग्नसमारंभाला हजेरी लावली. तिथे नवरदेवाला मिरवण्यासाठी आणलेला भला मोठा डाॅल्बी पाहुण नेमकं याच्या आत असतंय तरी काय या उत्कंठेने डाॅल्बीच्या गाडीत चढलो. आधुनिक युवकांचं रक्त उसळणारी ही मशिन नेमकी असती तरी कशी ? ही चालवते कोण ? शासनमान्य आवाजाची डेसिबल मर्यांदा तोडणारं बटन नेमकं असतंय तरी कुठं ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायला मी डाॅल्बीच्या मशिनजवळ अर्धा तास होतो. पहिल्यांदा डाॅल्बीवाल्या माणसाला वाटलं मी कोणी साध्या वेशातला पोलिसच हाय का काय; तवाच एवढी चौकशी करायलाय, नंतर मी सांगितलं की, मला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात म्हणून मग त्याने मला संपुर्ण माहिती दिली.

डाॅल्बी मधलं काॅन्सल नावाचे बटन तुमच्या रक्ताला चिथावणी द्यायला महत्वपुर्ण असते. एक गाणं सुरू असतानाच त्यात दुसरं घुसडवायला मिक्सरबी तितकाच महत्वाचा असतो. एक गाणं तर अखंड हितं वाजतच नसतंय. डाॅल्बी कुणी का लावेना पण गाणी बदलायला सांगायचा अधिकार मात्र समोर नाचणाऱ्या सगळ्यांचाच असतो त्यामुळं कधी कोण झुलत डुलत यील आन् गाणं बदल म्हणीन सांगता येत नाही त्यामुळे डाॅल्बी मशिनच्या डिस्प्लेवर गाण्याची नावे असतात त्याने गाणी लवकर सापडतात आणि तसंबी डाॅल्बीवाल्याने अशा कामात पीएचडी केलेली असते म्हणुन त्या त्या काळात गाजलेली गाणी व पब्लिक डिमांड त्यांना आधीच ठाऊक असतात. नाचताना एखादा गावठी डान्सवाला पोरगा त्याच्या अंगाला जितके आळुखे पिळुखे देतो तेवढेच आळुखे पिळुखे तो डाॅल्बीवाला त्या मशिनवरील बटनांना देत असतो म्हणुनच छातीत धडकी भरवणारा, जमिन हादरवणारा आवाज साऊंडमधून बाहेर पडत असतो.

नाचणे हा सळसळत्या तारूण्याचा एक भाग झाला आहे. कार्यकर्त्यांना आवडतंय म्हणुन नेत्यांना, मित्रांना आवडतंय म्हणुन नवरदेवाला, सदस्यांना आवडतंय म्हणुन मंडळाच्या अध्यक्षाला डाॅल्बी लावणे जणू अनिवार्य होऊन बसलंय. शेवटी पब्लिक डिमांडला ते तरी काय करणार म्हणा. हा पायंडा सहजा सहजी बंद होणे अशक्यच पण या माध्यमातुन उसळणारी भांडणे, शरिराला आणि समाजाला होणारा त्रास हे देखिल लक्षात घेऊन उत्सव साजरे होणे गरजेचे ठरते.

डाॅल्बीमुळे सनई चौघडे, पिपाण्या, तडमताशे, ढोल अशा पारंपारिक वाद्याला आपोआप शह मिळालाय. एका पिपाणीवर संसार हाकणाऱ्या पिपाणीवाल्याचा तोंडचा घास अशा आधुनिक तंत्रज्ञानाने हिरावून घेतलाय. विज्ञानाच्या युगात या गोष्टी आपोआपच घडत राहणार याला डाॅल्बीवाले सुद्धा अपवाद नाहीत. पब्लिक डिमांड ओळखून ब्राॅस बॅण्ड कंपण्यांनीच आता डाॅल्बी डिजिटल बिरूद लावलंय. समाज बदलला की समाज माध्यमही बदलनारंच फक्त डाॅल्बीवर बेधुंद होऊन नाचता नाचता ह्रदयात झिरपलेले महापुरूषांचे विचार हेंडकाळू नये एवढीच अपेक्षा. बजाओ..धंदडांग तताडांग…धंदडांक तताडांग

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०३ मार्च २०१९