डॉ.कुंताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच बार्शी येथे पार पडला. सदर पुरस्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने, बार्शीचे नगराध्यक्ष असिफ भाई तांबोळी यांच्या शुभहस्ते मी सपत्नीक स्वीकारला. आयुष्याच्या या टप्प्यावर जीवनाचा गौरव होणे म्हणजे माझ्या खांद्यावर पडलेले हे कलारसिकांच्या अपेक्षांचे ओझे आहे जे पुढील काळात मी समर्थपणे पेलेन.

पुरस्कार हे वय पाहून नाही कर्तृत्व पाहून दिले जात असतात याची अनुभुती या पुरस्कार सोहळ्यात आली. विविध क्षेत्रातील नऊ रत्नांचा यावेळी सन्मान करण्यात आला. “मला मिळालेला हा पुरस्कार आजवर माझ्या कलाकृतीला दाद देणाऱ्या तमाम कलारसिक श्रोत्यांना अर्पण करत आहे” पुढील काळात अजून दर्जेदार कलाकृतींना जन्माला घालण्याचा प्रयत्न असाच सुरू राहील त्यासाठी तुमचे आजवर लाभलेले प्रेमही असेच सुरू ठेवा.

पुरस्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त करताना मी वायुवपुत्र नारायणराव जगदाळे यांच्या स्मृती जागवल्या, डॉ.कुंताताई जगदाळे यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला. तसेच संस्थेच्या जडणघडणीतील योगदानाबद्दल डॉ.यादव साहेब आणि नंदनजी जगदाळे यांचा कार्यकर्तृत्वाचा शब्दांनी गौरव केला. थोडक्यात मांडलेल्या विचारांनी सभागृह दणाणून सोडले. मला प्रथमच ऐकलेल्या श्रोत्यांच्या प्रतिक्रियांनी भारावून गेलो.

आम्हाला पुरस्कृत करून आमचा यथोचित सन्मान केल्याबद्दल डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, निवड समितीतील सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच आम्हाला सन्मानित करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि पुरस्कार हातात घेतल्यानंतर ज्या हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्या प्रत्येक हातांचे देखील मी आभार मानतो.

विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०२१