प्रसार माध्यमांनो, राज्यात लॉकडाऊन ? अशा बातम्या चालवून सरकारवर दबाव टाकण्यास तयार राहा. मंत्र्यांनो, न्यूज चॅनेल्सच्या बातम्या बघून बघून लॉकडाऊनची भीती दाखवणारे स्टेटमेंट द्यायला तयार राहा. सरकार, कोरोना टेस्टची संख्या वाढवायला तयार राहा.

सरकारच्या काही कर्मचाऱ्यांनो, घरी बसून फुल्ल पगार घ्यायला तयार राहा. पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनो, आहे एवढ्याच पगारीत तिप्पट काम करायला तयार राहा. खाजगी नोकरदारांनो, पगार कपातीस तयार राहा. कामगारांनो, पुन्हा बेरोजगार व्हायला तयार राहा.

डॉक्टरांनो, दिड लाख रुपये प्रति पेशंट प्रमाणे उपचार करण्यास तयार राहा. मेडिकलवाल्यांनो, ही औषधे कोरोनावर प्रभावी आहेत का नाहीत माहीत नाही पण रेमडीसीविर, टोसिलिझुमबचा स्टॉक करायला तयार राहा. काळा धंदा करणाऱ्यांनो, कोरोना उपचाराची औषधे दहापट किंमतीने विकायला तयार राहा.

बार वाल्यांनो, दारूच्या बॉक्सनी गोडाऊन भरायला तयार राहा. टपरिवाल्यांनो, गुटख्याचा स्टॉक करायला तयार राहा. छोट्या मोठ्या दुकानदारांनो, शटर ओढायला तयार राहा. शिक्षकांनो, ऑनलाइन शिकवायला आणि विद्यार्थ्यांनो, मोबाईलवर शिकायला तयार राहा. पत्रकारांनो जीव धोक्यात घालून कव्हरेज द्यायला तयार राहा.

कृषी कंपन्यांनो, खते, बी बियाणे आणि औषधांचे भाव वाढवायला तयार राहा. तेल कंपन्यांनो, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायला तयार राहा. शेतमाल व्यापाऱ्यांनो, तुम्ही मात्र लॉकडाऊनचे कारण सांगून शेतीमालाचे भाव पाडायला तयार राहा. शेतकऱ्यांनो, अवकाळी पाऊस आणि गारपीठीनंतर आता सरकारी नुकसानीसही तयार राहा.

सरकारला एवढीच विनंती,
कोरोना झालाच शेतकऱ्याला तर निदान त्याला त्याचा उपचार करण्याऐवढे तरी पैसे कमवू द्या. सलग दोन वर्षे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांनी आता बऱ्यापैकी लसीकरण झाल्याने लॉकडाऊन होणार नाही या आशेने उरला सुरला सगळा पैसा शेतावर लावला होता पण जर आता लॉकडाऊन झाले तर मायबाप शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जाईल. लॉकडाऊन तर दूरच पण त्याच्या नुसत्या अफवेनेही शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे तेव्हा तुमचं काही ठरायच्या आधी तशा बातम्या पेरणाऱ्यांची थोडी वेसन आवळा. सुगीच्या दिवसात लॉकडाऊन कराल तर चार माणसं वाचवण्याच्या नादात हजार शेतकरी माराल.

सर्वात महत्वाचं,
सुजान नागरिकांनो, ज्यांनी लस घेतलीच नाही त्यांनी लस घ्यायला, लक्षणे दिसणाऱ्यांनी इतरांपासून दूर राहायला, सर्वांनीच मास्क वापरायला, हात धुवायला आणि सोशल डिस्टंसींग पाळायला तयार राहा. आपण जर ही तयारी ठेवली तर सरकारही लॉकडाऊनची तयारी करणार नाही अन्यथा जिवीत आणि वित्तहानीस तयार राहा.

विशाल गरड
२ जानेवारी २०२२