मुंबईच्या गटारातून पाणी कमी कचरा आणि प्लॅस्टिक जास्त वाहत आहे. त्यातला कचरा काढणारे किती आणि त्यात कचरा टाकणारे किती आहेत याचा विचार केला की उत्तर मिळते. मुंबईत माती शोधून सापडत नाही मग या गटारी गुटख्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग आणि इतर तत्सम टाकाऊ पदार्थांनीच तुंबतात. ही घाण करणारे आपणच आहोत आणि अशी परिस्थिती झाल्यावर शिव्या घालणारेही आपणच आहोत. पाणी तुंबण्याची इतरही अनेक कारणे आहेत हे मला माहित आहे पण त्यापैकी गटारी तुंबने हे ही एक महत्वाचे आहेच.

कोण म्हणतंय गटार घाण असते उलट आपली घाण वाहून नेणाऱ्या त्या स्वच्छतेच्या दूत असतात. घाण तर माणूस आहे पण बिचाऱ्या गटारी बदनाम होतात. शहरात जेवढी महत्वाची तुमची घरे आणि दुकाने आहेत तेवढ्याच महत्वाच्या गटारी आहेत. हिवाळा आणि उन्हाळा त्यात कोंबत राहायचं आणि पावसाळ्यात मग बोंबलत राहायचं हे चालायचंच. खरंतर प्लॅस्टिक बॉटल मधले पाणी पिल्यावर जेव्हा आपण ती बाटली बेदरकार पणे रस्त्यावर फेकून देत असतो तेव्हाच मुंबईची तुंबई करण्यास हातभार लागलेला असतो. या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या एकदिवस माणसाला पाण्यात बुडवून मारतील.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०६ ऑगस्ट २०२०