भारताला टोकियो ऑलम्पिक मध्ये सिल्व्हर मेडल मिळवून दिलेला कुस्तीपटू राविकुमार दहियाचा फोटो थम्सअपच्या कॅनवर पाहून वाईट वाटले. या कंपन्या तांबडं विष पाजण्यासाठी काय काय क्लुप्त्या वापरतील सांगता येत नाही. भारतीयांच्या मानसिकतेचा फायदा कसा घ्यायचा हे यांच्याकडून शिकावं. प्रकाशझोतात असलेल्या अभियेनेत्यांना किंवा खेळाडूंना करोडो रुपये मानधन दिले की हे जाहिरात करायला मोकळे. यांच्या जाहिरातींचा युवा पिढीच्या मनावर किती भयानक परिणाम होतो याचे कुणालाच काही पडलेलं नाही.

सलमान खान असो किंवा राविकुमार त्यांनी त्यांची बॉडी दूध पिऊन तयार केली हे सत्य तेही सार्वजनिकपणे मान्य करतील. त्यांनी एखादया प्रोडक्टची जाहिरात करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे पण केवळ ती जाहिरात पाहून जर आपण दुधाऐवजी कोक पीत असू किंवा आपल्या लेकरांना पाजत असू तर आपली लेकरं सिनेमात किंवा मैदानात नाही तर दवाखान्यात दिसतील. जगात सर्वाधिक मधुमेह आणि कॅन्सरचे रुग्ण असलेल्या देशात या गोड विष्याच्या जाहिराती प्रसिद्ध होतात हे भयानक आहे.

जागतिकीकरणाच्या दुनियेत या व अशा अनेक कंपन्या खोट्या जाहिराती करून आपल्याला अमिष दाखवण्याचा प्रयत्न करत राहतील. पैसे कमावण्याच्या अमिषापोटी त्या कंपन्यांना आपल्या आरोग्याशी काहीही देणे घेणे नसते. त्यामुळे सायन्सच्या युगात आपणच शहाणे होऊन कोल्ड्रिंक्सच्या जाहिरातींना फाट्यावर हाणून आपल्या युवा पिढीला फ्रुट ज्युस, दूध, नारळपाणी प्यायला प्रोत्साहित करायला हवे. बाकी डोळ्यातून डोक्यात कोल्ड्रिंक्स उतरवण्याचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे पण तुम्ही दुधावर ठाम राहा.

विशाल गरड
दिनांक : ११ ऑगस्ट २०२१