रेल्वे प्रशासनात अधिकारी म्हणून काम केलेल्या येडशीच्या सौदागर मोहिते साहेबांनी येडशीच्या बाहेर जुन्या रेल्वे लाईन लगत दत्तगुरूंचे अतिशय सुंदर मंदिर बांधले आहे. मंदिराच्या सभामंडपात सर्व देव देवीच्या मुर्त्या स्थापित केल्या आहेत. प्रशस्त वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी फार प्रसन्न वाटते. प्रशासनात काम करता करता मोहिते साहेबांनी कृषी आणि आध्यात्मिक आवड जोपासली. रेल्वेस्टेशन लगत असलेल्या त्यांच्या शेतात त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून प्रगतशील बागायतदार म्हणूनही लौकिक मिळवला आहे.

साहेबांना एकूण तीन अपत्य, मोठी मुलगी कांचन डॉक्टर असून ती येडशीतच रुग्णसेवेचे कार्य करत आहे, मुलगा सुरज इंजिनिअर तर प्रथमेश वकील आहे. त्या सर्वांना उच्च शिक्षित करून त्यांनी त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केले. त्यांची अर्धांगिनी सौ.सुचिता मोहिते यांनी प्रापंचिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत साहेबांना मोलाची साथ दिली. संपूर्ण मोहिते कुटुंब मंदिरातच राहून पूर्णवेळ सेवा करत आहेत. फक्त येडशी पंचक्रोशीच नव्हे तर महाराष्ट्रातून या मंदिरात भक्त येतात. गावकुसातील दत्त भक्तांना गाणगापूरला दर्शन केल्याची अनुभूती देणारे येडशीस्थित दत्त गुरुचे मंदिर भाविक भक्तांच्या पसंदीस उतरले आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली पण तोंडावर आलेली लग्न टाळता येत नाहीत त्यामुळे सध्या मंगल कार्यालयांवर अवास्तव खर्च करण्यापेक्षा दत्त गुरूंच्या सानिध्यात आणि निसर्गमय वातावरणात प्रशस्त लग्न सोहळे करण्यासाठी देखील येडशी परिसरातील भाविक मंदिराची निवड करत आहेत. लोकांची हीच गरज ओळखून मोहिते साहेबांनी लग्न समारंभासाठी लागणारी सर्व सामग्री सेवाभावी दरात मंदिरात उपलब्ध करून दिली आहेत त्यामुळे गोरगरिबांच्या मुलाबाळांची लग्नाची स्वप्न इथे साकार होत आहेत.

तन, मन, धनाने दत्त गुरुची सेवा करत, आपल्या प्रामाणिक आणि आपुलकीच्या वागण्यातून सर्वांना मोहित करणारे, गुरू सेवेतले सौदागर म्हणजेच श्री.सौदागर मोहिते साहेब यांच्या पुढील कार्यास मनापासून हार्दिक शुभेच्छा. सध्याच्या आत्मकेंद्री जमान्यात, मोहिते साहेब समाजासाठी देत असलेले योगदान फक्त उल्लेखनीय नसून ते अनुकरणीय आहे. आजच्या आधुनिक युगात संत सावता माळी आणि संत चोखामेळा यांचा वारसा जोपासणाऱ्या  त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वास दत्तगुरूच्या कृपेने दिर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २९ डिसेंबर २०२० (दत्त जयंती)