आवं म्या कुठला बीजी माझ्यापरीस तर माझी आय जास्त बीजी हाय. घरातली समदी काम करता-करता पार झाक पडती पण हिजी कामं काय उरकत न्हायती. हिला निवांत बोलायचं म्हणलं की एकतर भाकऱ्या थापताना न्हायतर भांडी घासताना. आजबी आमच्या हौदापशी आय भांडी घासत व्हती आन् म्या आपलं गप्पा मारीत व्हतो त्येज्यातच फुटू काढायल्यालं बघून आयनं दोन खमंग डायलाॅग मारलं. “आरंय ! तस्लं काय फुटू काढतोच रं, बाप शिव्याच घालीन तुला”, “चांगली साडी चुळी घातल्यावर कुठं जातुस रं” तरीबी म्या तसंच दोन फ्लॅश मारलं. आव मी कुठला आलोय साहित्यिक माझी आय आसल्या पाच पन्नास पुस्तकांचा आर्क एका वाक्यात सांगत अस्तीया. मी तर सायन्स ग्रॅज्युएट माणुस है पण आर्टची डिग्री म्या ह्याच चुलीम्होरच्या ईद्यापीठातुन घेतल्याली हाय. कामाला लईच खंबीर खट्ट हाय माझी आय. तीज्या पोटातुन आल्याचा मईंदाळ आभिमान वाटतंय मला म्हणुनच तर एकाच टायमात बहुआघाड्यावर काम करायची हिम्मत ठिवतो म्या. ती तसलं प्रेरणा, ईन्सिपीरीशन वगैरे घ्ययला लईमटी पुस्तकं नाय मी वाचत बसत फकस्त आईकडं काम करताना बघीतलं की दहा हात्तीच बळ येतंय आपसुक.

लई लई लई मजी लईच काम केलंय माझ्या आयनं आजवर आन् आजुनबी करतीया. तीला माझ्यापाठी आजुन एक दोन पोरं पायजे व्हती पण पोरीच झाल्या; तरी नाय काय वाईट वाटून घेतलं तीनं उलट सारखं म्हणायची “आसुंदे ! ईकुलता एकच हाय माझा ईस्ल्या; तरीबी चार पाच पोरांच्या बरूबरीचं नांव कमवील”. खरंच हाय की तीचं, म्या हाय ईकुलता एक पण आता माजी आय सांगत आस्ती समद्यास्नी की; माझं एक पोरगं माईकवर बोलतंय, दुसरं चित्र काढतंय, तिसरं लेखक हाय आन् चौथं कवीता करतंय. बास की आजुन काय पायजेल. पोरं किती हायती ह्ये नाय महत्वाचं ती काय हायती आन् काय करत्याती हे जास्त महत्वाचं हाय, आसं म्या नाय माझी आय म्हणतीया.

लेखक : प्रा.विशाल गरड 
दिनांक : ०५ एप्रिल २०१८