फोटोग्राफीला फक्त व्यवसायापूरते मर्यादित न ठेवता या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवणारे. ‘फोटोआर्टीओ’ स्कूल ऑफ फोटोग्राफीचे संस्थापक, द ग्रेट आर्टिस्ट सचिन भोर यांची आज पुण्यात सदिच्छा भेट झाली.

माझे अमेरिकास्थित प्रिय मित्र महेश भोर यांच्याकडून सचिनदादा बद्दल मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा पासूनच मला त्यांना भेटायची ओढ लागलेली आणि सचिन दादांना ही मला भेटायची ओढ लागलेली. एकमेकांच्या फेसबुक टाईमलाईनला रोज भेट देणारे आम्ही आज मात्र प्रत्यक्ष भेटलोत. दिड तासाच्या भेटीत दोघेही समृद्ध झालो. किती गप्पा माराव्या, किती किस्से सांगावे आणि किती आठवणी सांगाव्या असे झाले होते. आमच्या दोघांच्या विचारांची एकरूपता एवढी होती की बोलताना जणू आम्ही दोघे एकमेकांना आरशात पाहत आहोत असे वाटायचे. प्रियदर्शनी वहिनी सुद्धा सचिन दादाला खांद्याला खांदा लावून साथ देतात. मुलगा जैत्र बालवयातच कॅमेरा हाताळतोय हे पाहून कौतुक वाटले.

फोटोग्राफी बद्दलची दादाची भावना एवढी नितळ, शुद्ध आणि पवित्र आहे की इतक्या खोलवर कुणी विचार करू शकते याचे आश्चर्य वाटले. लहानपणी कला शिक्षक असलेल्या वडिलांच्या बोटाला धरून त्यांना त्यांच्या कलाकुसरीत मदत करता करता सचिनचा प्रवास आज फोटोग्राफीतला तेंडुलकर बनण्याएवढा अभिमानास्पद झालाय. त्यांच्या स्टुडिओत बसलो की आपण एका वेगळ्या दुनियेत असल्याची जाणीव होते. भिंतीवर असलेली प्रत्येक फ्रेम त्यांच्यातल्या टॅलेंटची साक्ष देते. फोटोग्राफी म्हणजे फक्त कॅमेऱ्याचे बटन दाबण्यापूर्ती मर्यादित नसून त्या मागे खूप मोठे शास्त्र आहे, अभ्यास आहे जे सर्वदूर वाहू देण्यासाठीच सचिन दादाने स्कुलची स्थापना केलीये तसेच त्यांच्या ‘रिस्पेक्ट’ फाउंडेशनचे कार्य ऐकून हा फोटोग्राफर माणूस म्हणून किती ग्रेट आहे याची जाणीव झाली.

स्वतःला आरश्यात बघत बसण्यापेक्षा सचिन भोर यांनी काढलेल्या फोटोत बघताना जास्त आनंद मिळतो. सगळे कॅमेरे सारखेच फोटो टिपतात पण ते कॅमेरे ज्याच्या हातात असतात त्याने जर कॅमेऱ्याचा हट्ट पुरवला तर फोटोचे रूपांतर चित्रात व्हायला वेळ लागत नाही. आज खरंतर फोटोग्राफीच्या विद्यापीठालाच भेट देऊन आल्याची जाणीव गडद झाली. कॅमेऱ्याचा गर्भ समजून सांगणाऱ्या आणि नवोदित फोटोग्राफर्सवर छायाचित्रणाचा गर्भ संस्कार करणारा सचिन भोर नावाचा शिक्षक खरंच अफलातून वाटला. ‘विवाह’ स्टुडिओत केलेल्या माझ्या सन्मानाबद्दल विवाह फोटोग्राफीच्या सर्व टिमचे तसेच कौटुंबिक आदरातिथ्याबद्दल सचिन भोर आणि प्रियदर्शनी भोर यांचे मनापासून आभार.

विशाल गरड
दिनांक : २७ ऑगस्ट २०२१