बारक्यापणीचा ह्यो सगळ्यात आवडीचा डोंगरी मेवा. शाळेत जाताना मधल्या सुट्टीत धामनं खायची म्हणून कायबी करून आईच्या डब्यातून सुट्टे दोन रुपये घेऊन जायचो. मधल्या सुट्टीचा टोल पडला रे पडला म्हणलं की लिंबाच्या झाडांकडं चिंगाट पळत सुटायचो, तिथे घोळवेवाडी किंवा ढेंबरेवाडीच्या एखाद्या मावशी न्हायतर तर मामा एका पितळी पाटीत धामनं घिऊन बसल्यालं असायचं. वर्गात श्रीमंतांची पोरं जवा पाच रुपयाचं माप हातावर घ्ययची तवा त्यांचा लंय हेवा वाटायचा. आम्ही आपलं एक एक रुपयांची दोन मापं खिश्यात टाकून एक एक तोंडात टाकत कडा कडा फोडीत बसायचांव.

कधी कधी आमच्या शाळेतल्या ‘क’ तुकडीतली पोरं शाळेला येताना खिसे भरून धामनं आणायची मग त्यादिवशी त्येंला मॉनिटरचा दर्जा असायचा. हावऱ्यासारखं त्याच्या फुगलेल्या खिशाकडं बघत बसायचो असे लैमटी खिदमत झाल्यावर मग त्यो बी खिशात हात घालून ‘खाओ रे गरिबो’ असे म्हणून तो वाटायचा. अशा वेळी वर्गातला सर्वात ढ वगैरे असणारा तो पण डोंगरात जाऊन वेचून ताजी ताजी धामनं आणायचा म्हणून पहिल्या बेंच वरची पोरं सुद्धा त्याच्या लास्ट बेंचवर तश्रीफ ठेवायची.

चार पाच हुशार टाळकी सोडली तर आम्ही सगळे टुकार, फिरस्ती, मध्यम ‘ढ’ वगैरे या कॅटेगरीतले विद्यार्थी होतो पण या हातावर गुटखा, तंबाखू, मावा असलं कधी पडलं नाही म्हणून स्वास्थ आणि शरिर मजबूत ठेवू शकलो. बाकी आजच्या पोरांनी सुद्धा त्यांच्या सुंदर तळहातावर हे असले पदार्थ घ्यायला हवे. चालू वर्गात चॉकलेट खायच्या जमान्यात ही असली धामनं खायची परंपरा सुद्धा जोपासायलाच हवी फक्त ती चावताना त्याच्या बिया कडा कडा फुटत असतात आणि जर का त्यो आवाज सरला कळला तर मग ओल्या छडीचे दोन फटके खायची सुद्धा तयारी ठेवलीच पाहिजे.

आज कॉलेजवर गेल्यावर सहज डोंगरात फेरफटका मारला आणि ह्यो श्रावण महिन्यातला डोंगरी गावरान मेवा झाडाचा एक एक तोडून खाल्ला. शाळेतल्या सगळ्या आठवणी पुन्हा  वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांसारख्या जाग्या झाल्या म्हणून तुमच्याशी शेअर कराव्या वाटल्या. मेट्रो शिटीतल्या सुमारे नव्वद टक्के पोरांना कदाचित याचे नावही नाही सांगता येणार पण गावातल्या शाळेत आम्हाला मात्र हा मेवा नुसतं बघायला नाही तर चाखायला सुद्धा मिळाला याचे श्रेय त्या ग्रामिण संस्कृतीलाच द्यावे लागेल ज्यात मी शिकलो, वाढलो आणि आजही तिथेच राहून जग जिंकण्याची धडपड करतोय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १० ऑगस्ट २०२०