आपलं नाव ही आपण करत असलेल्या कामाची सर्वोत्तम ओळख असते. हाडामासाच्या गोळ्याला समाजात ओळख देण्याचे काम आपलं नावच करत असते. एखादे नाव उच्चारलं की त्या नावाशी जोडलेल्या सर्व अभिव्यक्ती लगेच डोळ्यासमोर उभ्या राहतात. यशाची व्याख्या आपल्या सोयीप्रमाणे करता येते परंतु माझ्यामते लोकांसमोर आपलं नाव म्हणजेच आपलं काम हे बिंबवायला आपण यशस्वी होतो तेच खरे यश असते. आपण किती दिवस जगावं हे आपल्या हातात नसतं पण आपल्यानंतर आपलं नाव किती दिवस जगावं हे मात्र सर्वस्वी आपल्याच हातात असतं. आपण कधीही न पाहिलेली माणसे आज नावाने जिवंत आहेत हजारो शेकडो वर्षानंतरही त्या व्यक्तींची फक्त नावे घेतली तरी आम्हाला स्फुरण चढते हे त्याचेच प्रतिक आहे. आपल्या नावाची भविष्यकाळातली वैधता आपण भुतकाळात केलेल्या आणि वर्तमान काळात करत असलेल्या कामावर अवलंबून असते.

जेव्हा आपल्या शरिरासोबत आपले नावही पुसुन जाते तेव्हा आपले नामोनिशान मिटले जाते. ‘मरावे परि किर्तीरूपे ऊरावे’ या उक्तीत मरणे हा शब्द शरिराशी तर किर्ती हा शब्द नावाशी चिकटलेला असतो. तेव्हा हयात आहात तोवर लोकांनी आपल्या नावाची थोरवी गावी असे काही तरी काम करता आले पाहिजे नाहीतर अब्जावधी नावांच्या गर्दीत आपलेही नाव हरवुन जाईल. आज मी स्वतःच्या नावाची कॅलिग्राफी काढता काढता हा विचार माझ्या मनातल्या गाभाऱ्यात धडका देत होता, मग मी पण लगेच दरवाजा उघडून बाहेर काढला. जे सुचलं ते मांडलंय बस्स सरतेशेवटी एवढंच म्हणावेसे वाटते की; दोस्तहो, स्वतःच्या नावासोबत दुसऱ्यांच्या नावावरही प्रेम करायला शिका कारण ईतरांच्या नावातुन प्रेरणा घेऊनच आपण आपलं व्यक्तिमत्व घडवत असतो.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३१ जानेवारी २०१९