रवीदादाचा न्यूड हा चित्रपट रिलीज झाल्यापासुनच बघायचा पक्का केला होता. कलाप्रिय आणि त्यात पुन्हा हाडाचा कलाकार माणुस असल्याने ही कलाकृती पाहणे माझ्यासारख्यासाठी तरी क्रमप्राप्तच होते. काल काॅलेज सुटल्यावर थेट लातूर गाठले आणि PVR थेटरात संध्याकाळचा साडे आठचा शो बघीतला. या चित्रपटासाठी संपुर्ण थेटरात फक्त सोळाजण होतोत यावरूनच अशा कलाकृती व विषय दिग्दर्शकाकडुन का जास्त प्रमाणात हाताळले जात नाहीत याची प्रचिती येते. मुळात माल मसाल्याचा हा चित्रपट नव्हताच तर डोळ्याचे ह्रदयाशी, ह्रदयाचे मेंदूशी आणि मग मेंदूचे बोटांशी असलेले नाते सांगणारी हि रवीदादाची रंग व कुंचल्याची कलाकृती होती. चित्रपट व कथानक संथ आहे परंतु संथ पाण्यातच प्रतिबिंब दिसतं म्हणुनच ती कथा तशीच गुंफली आहे.

कल्याणी मुळे या अभिनेत्रीने अभिनयाचे कल्याण करून चित्रपट मुळासकट हादरून टाकलाय. त्याला छाया अक्काने पण जबरदस्त सोबत दिली आहे. रवीदादाचं दिग्दर्शन नेहमीसारखंच चोख आणि नाविण्यपुर्ण झालंय. एकुणच चित्रपटातुन जे सांगायचंय ते अतिशय प्रभावीपणे मांडण्यात टिमला यश आलंय. हि नागवी चित्र बघता बघता आपल्याही नजरेवर नकळतच कलाकाराचा पडदा चढत जातो.

तो नागडा देह पाहुण माझ्या इंद्रियाकडच्या नाही तर मेंदुकडच्या रक्तवाहिण्या जास्त वेगानं धावल्या. पिच्छर ए ग्रेड तरीही इंद्रिय शिथिल होऊन बसलं होतं; अर्थात मी एक कलाकार असल्याने मेंदुलाही कळलं असावं कि रक्तदाब कुणीकडे वाढवला पाहिजे म्हणुन. नजरेला काय दिसतं यावर अश्लिलता अवलंबुन नसते तर त्यावर आपला मेंदु कसा विचार करतो यावरच ते अवलंबुन असते. पाॅर्न फिल्म पाहताना त्या माॅडेलच्या इंद्रियांवरून फिरणारी आपली नजर तीच्या डोळ्यात डोळे घालून तिची मजबूरी कधीच ओळखू शकत नाही कारण ती नागडी शरिरे पाहुन आपली इंद्रिये सुसाट धावलेली असतात. मेंदूचे आदेशही तिकडेच रक्तपुरवठा करा म्हणुन निघालेले असतात. पण न्यूड पाहताना मात्र त्या युमुनेच्या डोळ्यातले पाणी यमुना नदीतल्या पाण्याहुण श्रेष्ठ वाटू लागते व ती करत असलेले कामही प्रतिष्ठेचे वाटू लागते. यासोबतच काम कोणतंही व कसलंही असुद्या सततच्या सवयीने त्यात आत्मविश्वास येतोच याचाही बोध होतो.

न्यूड मधले मला आवडलेले काही निवडक संवाद या लेखात देत आहे. खरंच या वाक्यांनी पैसा वसूल करून टाकलाय.
“पैसे नाहित आन् आली फुकटात हागायला”
“कपडा जिस्म पे पेहनाया जाता है, रूह पे नही”
“या जगात गरिब बाई कापडं घालूनबी सगळ्यांना नागडीच दिसती”
“बापड्यांची छातीकडची नजर हिकडं वर वळवायची,कुंकवाकडं”
“त्यांच्या नजरेत वकवक नसती; अभ्यास असतो”
हे संवाद म्हणजे न्यूड चित्रपटाचा आत्मा आहेत. हे वाचायला जेवढे सोपे तेवढेच समजुन घ्यायला आणि जगायला अवघड आहेत.

यमुना कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर जेव्हा न्यूड पोझ देऊन बसते तेव्हा ती एका टेबलावर दोन पाय चिकटवून थोडीशी तिरपी होऊन उजव्या हाताने वक्षस्थळ झाकून बसलेली असते. हा सीन पाहत असतानाच थेटरमध्ये माझ्या मागील सिटवरून आवाज आला. अगंऽऽ हात काढं की! हा..हा..हाऽ, यावरून त्याच्या सोबतच्यांनी त्याला हसून दाद दिली. मला त्या व्यक्तींचा खुप राग आला परंतु रवीदादा अशा लिंगपीसाट व्यक्तीला चित्रपटाच्या शेवटी नक्कीच काहीतरी मेसेज देईल असा विश्वास होता आणि तसेच झाले. शेवटच्या फ्रेममधुन त्या व्यक्तीला त्याचे उत्तर मिळाले आणि पिच्चर सुटल्यावर त्या व्यक्तीकडे विजयी मुद्रेत एक कटाक्ष टाकून मी पायऱ्या उतरू लागलो. या चित्रपटाचे परिक्षण एका वाक्यात करायचे म्हटलं तर एवढंच म्हणता येईल की, रवीदादाचा हा सिनेमा नागडा देह पाहुण कमरेखाली गुदगुदल्या होण्यासाठीचा नसून तो कमरेवरील अवयवांना विचार करायला लावणारा आहे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०३ मे २०१८

34 COMMENTS

  1. Wonderful article! This is the kind of information that are meant to be shared across the web.
    Shame on Google for no longer positioning this put up higher!
    Come on over and discuss with my website . Thank you
    =)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here