वय अंदाजे नव्वद असेल, ती चालली होती एकटी डोक्यावर सरपण घेऊन. गाडी तिच्या थोडी पुढे नेऊन थांबलो, लांबूनच तिचा एक फोटो टिपला. ती जवळ येताच मी हटकले “ए आज्जे अगं कुठं निघालीस हे वझं घिऊन ? चल दे ती माझ्याकडं मी न्हेतो तुझ्या घरापस्तोर” तिने डोक्यावरचा बिंडा खाली टाकला आणि रोडच्या साईडला बसून बोलू लागली “आरं नकु, हिकाय जवळ आलंय घर, हितच तर हाय” मी खूप विनवणी केली पण आज्जीबाई काय माझ्यासोबत यायला तयार होईना.

शेवटी न राहवून तिच्या हातात थोडे पैसे देवून म्हणालो “पोटाला खा जरा” त्यावर मी दिलेली नोट परत देत ती म्हणाली “आरं नकु बाबा पैसं, धर” मी पुन्हा आग्रह केला “अगं नातवाने दिली समजून ठेव” खूप विनवणी केल्या नंतर शेवटी तिने ती नोट ठेवली, हाताने नोटेची गुंडाळी करत मला म्हणू लागली “लंय मयाचा हायस की रं बाबा, आई बाप हायेत का ?” “व्हय ! हायतं की”, “आन लेकरं बाळ”, “व्हय एक पोरगी हाय” “वळकीचा ना पाळकीचा पण थांबलास की रं बाबा, लय आशिर्वाद लागत्याल रं पोरा” असे म्हणून गळ्यातली तुळशी माळ काढून आभाळाकडे पाहत “उपकार कसं फेडू” असं पुन्हा पुन्हा म्हणू लागली. तिचे शब्द ऐकून माझ्याच डोळ्यात पाणी तरळले.

काम न करता कुणीतरी दिलेले पैसे घेणे कदाचित तिच्या तत्वात बसत नसावे म्हणूनच या वयातही ती स्वाभिमानाने काम करत असावी, एवढ्या म्हातारपणी तिला हे काम का करावे लागत आहे ? घरी कोण कोण आहे ? नवरा, मुले, मुली ? वगैरे गोष्टी मी तिला विचारल्या नाहीत कारण तिची परिस्थितीच त्याचे उत्तर देत होती. आपण स्टार लोकांसोबत, मोठ्या पुढाऱ्यांसोबत सेल्फी घेत असतो पण माझ्या आयुष्यातले बहुतांशी सेल्फी हे कोणत्याही परिस्थितीत हार न मानता अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणाऱ्या आजीबाई सारख्या गावकुसातील सेलिब्रेटींसोबत असतात.

माझं ‘रिंदगुड’ हे पुस्तक अशाच सेल्फी मधून जन्माला आलंय. गावकुसातील अशी कितीतरी माणसं त्या पुस्तकात नायक आहेत. “आज्जे, मला तुझ्यासोबत एक फोटो घ्यायचाय” असं म्हणल्यावर ह्या वयातही आज्जीने तिचा पदर सावरला. संस्काराची अशी इरकलीत गुंडाळलेली विद्यापीठे मानव जातीला समृद्ध करत आली आहेत. ती आहेत तोवर त्यांना जपलं पाहिजे इतकंच.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २५ नोव्हेंबर २०२०